मंचर(पुणे) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे मानसपुत्र म्हणून ओळख असलेले विद्यमान सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवार यांच्यासोबत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत शपथ घेतली, त्या वेळी दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांना सोडल्याचा धक्का सर्वांनाच बसला. त्यानंतर दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांच्याशी चर्चा करताना फारसे दिसले नाहीत. मात्र, हा योग पुन्हा एकदा जुळून येणार आहे. त्यामुळे गुरू आणि शिष्याची भेट होण्याचा योग पुन्हा एकदा जुळून आला आहे.
शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील यांची पुन्हा एकदा समोरासमोर भेट होणार आहे. शनिवारी (दि. 12) मांजरी येथे वळसे पाटील आणि शरद पवार हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात एकत्र येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्यात शरद पवार पुणे येथील कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्या कार्यक्रमातही अजित पवार यांनी शरद पवारांसमोर जाणे टाळले होते. आता तर शरद पवार, वळसे पाटील हे साखर महासंघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी राज्यातील साखर कारखान्याचे अध्यक्ष, कार्यकारी संचालक आणि ऊसशेतातील तज्ज्ञ यांचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील समोरासमोर येणार असल्याने ते काय बोलतात, याबाबत राजकीय उत्कंठा शिगेला पोहचली आहे. शरद पवार यांचे स्वीय सहायक म्हणून दिलीप वळसे पाटील यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती, त्यानंतर गेली पंचेचाळीस वर्षे शरद पवारांचे एकनिष्ठ शिष्य तसेच मानसपुत्र म्हणून त्यांची राज्यात ओळख आहे. अजित पवार हे शरद पवारांची साथ सोडून शिवसेना-भाजप सरकारच्या आघाडीला साथ देण्यासाठी बाहेर पडले, त्या वेळी त्यांच्याबरोबरच वळसे पाटील बाहेर पडल्याने सर्वांना धक्का बसला होता. मात्र, आता पुन्हा एकदा गुरू-शिष्य समोरासमोर येणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा