Latest

कोल्‍हापूर जिल्ह्यातील ‘ही’ सात खेडी प्राथमिक सुविधेपासून अनेक वर्षे वंचित

अमृता चौगुले

नृसिंहवाडी (कोल्‍हापूर), पुढारी वृत्‍तसेवा : खवा व चक्क्यासाठी प्रसिद्ध असलेल्या कृष्णा नदी पलीकडील सात खेड्यांत अत्यावश्यक सुविधांचा अद्यापीही अभाव आहे. औरवाड, गौरवाड, आलास, बुबनाळ, कवठेगु लंद, शेडशाळ, गणेशवाडी ही सात खेडी प्राथमिक सुविधेपासून गेली बरीच वर्षे वंचित आहेत.

गौरवाड, आलास, बुबनाळ या ठिकाणचा खवा प्रसिद्ध आहे. तर गणेशवाडी हे गाव चक्क्यासाठी विशेष प्रसिद्ध आहे. दुधापासून निर्माण केलेले विविध पदार्थ महाराष्ट्र व कर्नाटकात पाठवले जातात. परंतु या सात खेड्याला जोडणारे रस्ते अरुंद व उखडलेले आहेत. तर सर्व गावांमध्ये एसटी थांब्‍याचे शेडही नाहीत. लोकप्रतिनिधी व शासकीय अधिका-यांनी या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणी ग्रामस्‍थांनी केली आहे.

कवठे गुलंद येथे नुकतेच आरोग्य केंद्र सुरू झाले आहे. परंतु ते अद्याप पूर्ण सक्षमतेने सुरू नाही. तर स्टॉफ सुद्धा‌ अपुराच आहे. त्यामुळे या सात खेड्यातील ग्रामस्थ नृसिंहवाडी कुरुंदवाड या ठिकाणी औषध उपचारासाठी येतात. या सात खेड्यांतील माळ भागातील आरोग्याचा प्रश्न देखील म्हणावा तसा मार्गी लागलेला नाही. कवठे गुलंद येथील एसटी बसेस थांबण्यासाठी मंदिर तसेच झाडांचा आसरा घ्यावा लागतो.

पावसाळ्यात ग्रामस्थांचे खूपच हाल होतात. महापुराच्या वेळी या सात गावांना बेटाच स्वरूप प्राप्त होते. या गावातील जमिनी काही प्रमाणात क्षारपड बनल्या आहेत. त्या सुधारणाचा प्रयत्न श्री दत्तक सहकारी साखर याची चेअरमन गणपतराव पाटील, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे करीत आहेत.

या गावातील रस्त्यावरून दुहेरी वाहतूक चालवणे अवघड आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्‌डे आहेत. गणेश वाडी या गावात पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. दोन दोन दिवस पाणी येत नाही असे ग्रामस्थांनी सांगितले.

श्री क्षेत्र नृसिंहवाडी औरवाड दरम्यान जिल्ह्यातील सर्वात उंच पूल झाल्याने आंतर राज्य वाहतूक हाेते. या पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. कारण कर्नाटक हद्‌द अगदी जवळच आहे. मंगावती, कागवाड, अथणी, विजापूर बागलकोट, गाणगापूर येथे जाणे येणे सोयीचे आहे.

खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी खासदार राजू शेट्टी यांनी या सात खेड्यांकडे अधिक लक्ष देऊन येथील आवश्यक सुविधांचा पाठपुरावा करून ग्रामस्थांना दिलासा देणे आवश्यक आहे

या सात खेड्यांतील अरुंद तसेच उखडलेले रस्ते धोक्याचे आहेत. या सात खेड्यातील खवा व चक्का यांचे महत्त्व तसेच आंतरराज्य वाहतूक लक्षात घेऊन या रस्त्याचा सार्वजनिक बांधकाम खात्याने आढावा घेऊन रस्ते चांगले करणे गरजेचे आहे.
– जयपाल कुंभोजे, पंचगंगा सहकारी साखर कारखाना व्हाईस चेअरमन

उर्वरित खेड्यात एसटी सेवा सुरळीत नाही. उन्हाळ्यातील व पावसाळ्यातील दिवस लक्षात घेऊन सर्व ठिकाणी  एसटी महामंडळाने शेड उभे करणे आवश्यक आहे.
– अन्वर जमादार किसान, आघाडी प्रमुख भारतीय जनता पार्टी

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT