Latest

जगातील 2 दिग्गज अंतराळ शास्त्रज्ञ करणार पृथ्वीचा अभ्यास; अवकाशात निरीक्षण शाळा पाठवण्याची मोहीम

अमृता चौगुले

पुणे : 'चंद्रयान' मोहिमेनंतर 'आदित्य' यानाचे प्रक्षेपण यशस्वी होताच आता 'नासा'ने मैत्रीचा हात पुढे करीत 'इस्रो'सोबत अवकाशात 'निरीक्षण शाळा' (ऑब्झरव्हेटरी) पाठवण्याची मोहीम हाती घेतली आहे. जगातील दोन दिग्गज अंतराळ संस्थांचे शास्त्रज्ञ एकत्र येत पृथ्वीचा विशेष अभ्यास करणार आहेत. या निरीक्षण शाळेची निर्मिती 'नासा'मध्ये सुरू असून, जानेवारी 2024 मध्ये ती अंतराळात झेप घेणार आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था (नासा) यांच्या संयुक्त विद्यमाने पृथ्वीचा अभ्यास करणार्‍यासाठी निरीक्षण शाळा तयार केली जात आहे. 'नासा' आणि 'इस्रो'चे शास्त्रज्ञ प्रथमच मोठ्या प्रयोगासाठी एकत्रितपणे ही मोहीम राबवत असून, या मोहिमेला 'निसार' असे नाव देण्यात आले आहे. ही निरीक्षण शाळा 'नासा'च्या प्रयोगशाळेत तयार होत आहे. तेथे 'इस्रो' व 'नासा'चे शास्त्रज्ञ एकत्रित काम करीत आहेत. 2024 मध्ये ही शाळा अंतराळात पाठवली जाणार आहे.

'इस्रो'वर पेलोडची जबाबदारी

ही निरीक्षण शाळा बारा दिवसांत पृथ्वीचा नकाशा तयार करून तिचे मॅपिंग करेल. ग्लोबल वॉर्मिंगची स्थिती, भारतीय किनारपट्टी व अंटार्क्टिकावर झालेले बदल याचा अभ्यास केला जाणार आहे. याचे पेलोड तयार करणे, हे आव्हानात्मक काम भारतीय शास्त्रज्ञ करीत आहेत.

काय आहे 'निसार' मोहीम?

'नासा' आणि 'इस्रो'तील अध्याक्षरे एकत्र करीत या मोहिमेला 'निसार' असे नाव देण्यात आले आहे. यात पृथ्वीवरील बदलत्या वातावरणाचा बारकाईने अभ्यास केला जाणार आहे. सुनामी, भूकंप, अवर्षण, पृथ्वीच्या वातावरणातील वाढते प्रदूषण, यासारख्या बदलांचा अभ्यास ही अवकाशातील निरीक्षण शाळा करेल. ही शाळा पृथ्वीभोवती बारा दिवस प्रदक्षिणा घालणार आहे. भारत आणि अमेरिकेचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, त्यातून जगाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास 'इस्रो'चे प्रमुख एस. सोमनाथ यांनी व्यक्त केला आहे.

'इस्रो' व 'नासा'चे शास्त्रज्ञ हे प्रचंड वैज्ञानिक क्षमता पूर्ण करण्याच्या एक पाऊल जवळ आले आहेत. या मिशनद्वारे आम्हाला पृथ्वीच्या वातावरणासह भूगर्भातील हालचालींचा सूक्ष्म तपशील मिळणार आहे.

– एस. सोमनाथ, अध्यक्ष (इस्रो)

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT