चाफळ (जि. सातारा) : पुढारी वृत्तसेवा
चाफळपासून दोन किलोमीटर अंतरावर गमेवाडीनजीक असलेल्या उत्तरमांड धरणाच्या भिंती शेजारून जाणार्या रस्त्याच्या बाजूला संरक्षण भिंत नसल्याने एखाद्या वाहनचालकांचा वाहनांवरील ताबा सुटल्यास वाहन उत्तरमांड धरणाच्या पाण्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येथे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कृष्णाखोरे विकास महामंडळाने येथील रस्त्यावर संरक्षण भिंत बांधावी, अशी मागणी पर्यटकांनी, ग्रामस्थांनी केली आहे.
गेले वीस वर्षांपूर्वी उत्तरमांड प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर उत्तरमांड धरणाच्या बाजूने पाडळोशी, विरेवाडीकडील गावाच्याकडे जाण्यासाठी नव्याने कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या वतीने उत्तरमांड धरणाच्या दक्षिण बाजूने रस्ता तयार केला. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने त्यावेळी संरक्षण भिंत बांधणे गरजेचे असताना देखील या ठिकाणी भिंत बांधली नाही. त्यामुळे येथे दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.
धरणाचे 90 टक्के काम सध्या पूर्ण झाले झाले असून, दहा टक्के काम धरणग्रस्तांची सर्व बाकी असलेली देणी जोपर्यंत शासन देत नाही, तोपर्यंत उर्वरित धरणाचे काम करू न देण्याचा व धरणांचे दरवाजे न बसवून देण्याचा निर्णय धरणग्रस्त शेतकर्यांनी घेतल्याने धरणांचे काम बाकी राहिले आहे.
सध्या या धरणात गेल्या वीस वर्षांपासून 75 टक्के पाणीसाठा करण्यास सुरुवात झाली असून धरणाच्या पाण्याची पातळी रस्त्याच्या दहा फुटांपर्यंत आहे. हिच पाणी पातळी पावसाळ्यात चार फुटांपर्यंत असते. त्यामुळे येथे प्रचंड प्रमाणात पाणी रस्त्यापर्यंत येत असते. या रस्त्यावरून शाळेचे विद्यार्थी सायकल व दुचाकीवरुन शाळेला येत असतात. तसेच अनेक पर्यटक देखील येथे रोज मोठ्या प्रमाणात वाहने घेऊन येतात.
त्यामुळे एखाद्या वाहनांवरील ताबा सुटल्यास वाहन उत्तरमांड धरणाच्या पाण्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. याची दखल तातडीने घेऊन येथील रस्त्यावर संरक्षण भिंत बांधणे गरजेचे आहे. दुर्घटना घडण्यापूर्वी याबाबत दक्षता घ्यावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ तसेच पर्यटकांमधून होत आहे.
सध्या धरण परिसरात राज्यांतून अनेक पर्यटक रोज हजारो संख्येने धरण परिसरात येत असतात. धरणाच्या सांडव्याची उंची देखील 70 फूट असून येथे फक्त पाईप लावण्यात आल्या आहेत. येथून अनेक पर्यटक व चाफळ भागातील शालेय लहान विद्यार्थी पाईप वरून खाली वाकून बघत असतात. त्यामुळे येथून एखाद्या विद्यार्थ्याचा तोल गेल्यास 70 फूट खोल असलेल्या खडकांवर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या ठिकाणीही पाईप काढून संरक्षण भिंत घेणे गरजेचे आहे. धरण व्यवस्थापनाच्या वतीने कोणतीच पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना केली नसल्याने पर्यटक बिनधास्तपणे धरण परिसरात फिरताना व अनेक पर्यटक धरणाच्या पाण्यात पोहताना दिसून येत असतात. त्यामुळे येथे दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धरणाचा मुख्य दरवाजा काही समाज कंटकांनी मोडून टाकला आहे. त्यामुळे धरणाच्या मुख्य गेटमधून अनेक लहान शालेय विद्यार्थी धरणाच्या भिंतीवरून पाण्यात आंघोळ करण्यासाठी जाताना दिसून येत आहेत.
या सर्व गोष्टींचा शासनाने व कृष्णाखोरे विकास महामंडळाने विचार करुन धरणाच्या बाजूने संरक्षण भिंत बांधावी तसेच धरणाचा मुख्य दरवाजा दुरुस्त करून बसवावा व येथे सुरक्षा रक्षक नेमावा अशी मागणी पर्यटक ग्रामस्थ व धरणग्रस्तांनी केली आहे.
हेही वाचा