ओमायक्रॉन : कोरोनावरील उपचार, 'या' आहेत स्वस्त विमा पॉलिसी | पुढारी

ओमायक्रॉन : कोरोनावरील उपचार, 'या' आहेत स्वस्त विमा पॉलिसी

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचे संकेत मिळत आहेत. भारतात नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉन ने धडक मारली आहे. महाराष्ट्रातही ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे सरकार आणि आरोग्य विभागाकडून उपचाराची पुरेशी व्यवस्था केली जात आहे. कोरोनाचा नवीन व्हेरिएंटदेखील फुफ्फुसात संसर्ग पसरवत असल्याचे काहींनी सांगितले आहे.

परंतु; सर्वांनी संसर्गापासून बचाव करण्यासाठी सुरक्षेच्या उपायांचा अंगीकार करणे गरजेचे आहे. लस घेणे, मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, गर्दी टाळणे यांसारख्या गोष्टींचा अवलंब करायला हवा. परंतु; एखादा व्यक्ती बाधित असेल तर त्यासाठी पुरेसे पैसे हाताशी असणे गरजेचे आहे.

यानुसार उपचार करता येईल. ज्यांच्याकडे पैशाची अडचण आहे, त्यांना काही प्रमाणात अडचणी येऊ शकतात. परंतु; लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. कारण, सरकारने कोरेाना उपचाराला कवच देणार्‍या विमा पॉलिसीची कालावधी मार्च 2022 पर्यंत वाढविला आहे. एखादा व्यक्ती आर्थिकदृष्ट्या सक्षम नसेल तर त्याने कोरोना कवचसारखी विमा पॉलिसी आवश्यक खरेदी करणे गरजेचे आहे. विमा नियामक संस्था ‘इर्डा’ने विमा कंपन्यांना देखील कोरोनाशी निगडित सर्व दावे तातडीने निकाली काढावेत, असे म्हटले आहे.

कोरोनाच्या उपचाराला द्या विमा कवच

प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट लक्षात असेल. दुसर्‍या लाटेचा हल्ला एवढा तीव्र होता की, बेड अपुरे पडले होते. ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली होती. अशावेळी काही खासगी रुग्णालयांनी अव्वाच्या सव्वा रक्कम आकारून लोकांकडून पैसे वसूल केले. त्यामुळे गरीब लोकांना उपचार करणे कठीण गेले. त्यामुळे तत्कालीन परिस्थितीत लोकांना उपचाराचा खर्च मिळवून देण्यासाठी विमा नियामकनेे सर्व विमा कंपन्यांना कोरोना रक्षक आणि कोरोना कवच नावाची विमा पॉलिसी लाँच करण्यास सांगितले.

विमा कंपन्यांनी देखील सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून कोरोना रक्षक आणि कोरोना कवच पॉलिसी लाँच केली आणि लोकांच्या अडचणी कमी केल्या. आता तिसर्‍या लाटेची शक्यता पाहता सरकारने या शॉर्ट टर्म पॉलिसीचा कालावधी वाढवून तो मार्च 2022 पर्यंत केला आहे. या पॉलिसीला मार्च 2022 पर्यंत खरेदी करता येऊ शकते आणि त्याचे नूतनीकरण करता येईल. त्यामुळे आता अशा प्रकारच्या पॉलिसीची खरेदी करून कोरोनाच्या उपचाराला विमा सुरक्षा कवच घेणे गरजेचे आहे.

कोरोना रक्षक आणि कोरोना कवचची वैशिष्ट्ये

‘इर्डा’च्या निर्देशानुसार विमा कंपन्यांनी कोरोनाच्या उपचाराला कवच प्रदान करण्याच्या उद्देशाने कोरोना रक्षक आणि कोरोना कवच यांसारख्या पॉलिसी बाजारात आणल्या आहेत. किमान 50 हजार आणि कमाल 5 लाख रुपयांपर्यंत कवच असणार्‍या या पॉलिसीचा हप्ता हा 447 रुपयांपासून सुमारे 5500 दरम्यान आहे. या कवचामध्ये रुग्णालयातील दैनंदिन खर्च, औषधे, डॉक्टरची फी, रुग्णालयाच्या अन्य खर्चाचाही समावेश केलेला असतो.

जर एखाद्या व्यक्तीचे वय 35 असेल तर त्यास 450 रुपयांच्या हप्त्यावर 50 हजारांचे कवच मिळेल. याशिवाय पॉलिसीचा कालावधी साडेतीन महिन्यांपासून 9.5 महिन्यांपर्यंत ठेवण्यात आला आहे. जर बाधित व्यक्ती घरात राहून उपचार करत असेल तर त्यावरही तत्काळ दावा मिळेल. परंतु; यासाठी रुग्णाला सरकारमान्य केंद्रावर कोरोनाची तपासणी करावी लागेल. घरातच चौदा दिवसांपर्यंत उपचार करण्याची सवलत प्रदान करण्यात येते.

स्वस्त पॉलिसी

कोरोना रक्षक आणि कोरोना कवच विमा पॉलिसी या बर्‍यापैकी स्वस्त विमा योजना आहेत. सर्वसाधारण 31 ते 55 वयोगटातील कोणतीही व्यक्ती केवळ 2200 रुपयांचा हप्ता देऊन अडीच लाखांपर्यंत कवच मिळवू शकते. पती-पत्नी आणि मुलांसाठी 4700 रुपयांचा हप्ता भरावा लागतो. कारोना रक्षक आणि कोरोना कवच विमा पॉलिसीसाठी घेण्यात येणारा हप्ताही एकरकमी असतो आणि जवळपास सर्वच कंपन्यांचा हप्ता सारखाच असतो. याशिवाय कोरोना रक्षक आणि कोरोना कवच विमा पॉलिसीच्या अटी आणि संरक्षण देखील जवळपास सारखेच असते. यात फरक असला तरी तो खूपच किरकोळ असतो.

विधिषा देशपांडे

Back to top button