मित्र किंवा नातेवाईकांना उसने पैसे देताना…या गोष्टी लक्षात ठेवा

मित्र किंवा नातेवाईकांना उसने पैसे देताना…या गोष्टी लक्षात ठेवा
Published on
Updated on

मित्र आणि कुटुंबांना उसने पैसे किंवा कर्ज देणे हा एक भावनात्मक निर्णय आहे. त्यामुळे ही बाब आणखीच अडचणीची ठरू शकते. उसने पैसे देणे हे आपल्या प्राप्तिकर कायद्यावरही परिणाम करू शकते. जेव्हा आपल्याला उसने पैसे परत मिळतील, तेव्हा ती रक्कम अधिक असेल आणि या स्थितीत बँक आपल्याला त्याचे कारण विचारू शकते.

मित्र किंवा नातेवाईकांना मदत करणे चांगली गोष्ट आहे. कोरोना संकटात अनेकांना रोकड टंचाई जाणवली. बँकांकडून देखील कर्ज दिले जात नव्हते. अशावेळी अनेकांना आपले नातेवाईक आणि मित्रांसमोर हात पसरावे लागले. अनेकांनी उसने पैसे घेतले. अर्थात, अनेक कुटुंबांत आणि मित्रांत उसण्या पैशाची देवाणघेवाण ही सर्वसाधारण बाब आहे. काहीजण व्याज आकारतात, तर काहीजण बिनव्याजी मदत करतात. परंतु; प्राप्तिकर कायद्यानुसार 20 हजारांपेक्षा अधिक उसने पैसे स्वीकारणे किंवा देणे हा कायदेशीर गुन्हा आहे. आपण या नियमांचे पालन केले नाही तर प्राप्तिकर खाते आपल्याला उसण्या पैशाएवढा दंड आकारू शकते.

269 एसएस कलम आणि 271 डी कलम म्हणजे काय?

प्राप्तिकर कायदा 1961च्या कलम 269 एसएस हे कोणत्याही व्यक्तीच्या खात्यात अन्य व्यक्तीने 20 हजार किंवा त्यापेक्षा अधिक रोकड जमा करणे किंवा उसने देण्यास मनाई करते. अर्थात, ही रक्कम धनादेशाद्वारे किंवा ऑनलाईन ट्रान्सफर करता येऊ शकते. त्याचवेळी कलम 271 डी म्हणते की, कलम 269 एसएसचे उल्लंघन करणे हा कायदेशीर गुन्हा आहे.

कलमाचा अर्थ

करतज्ज्ञ म्हणतात की, कोणताही व्यक्ती उसने किंवा डिपॉझिट म्हणून अन्य व्यक्तींकडून 20 हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम स्वीकारू शकत नाही. प्राप्तिकर कायदा '269 एसएस' मध्ये त्याचा स्पष्टपणे उल्लेख आहे. एखाद्या व्यक्तीकडून पैसे घेत असाल तर आपण उसने आणि डिपॉझिट असे एकूण 20 हजार किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम स्वीकारू शकत नाही.

100 टक्के दंड

एखादा व्यक्ती कलम '269 एसएस'चे उल्लंघन करत असेल आणि त्यात तो दोषी आढळून येत असेल तर त्याला दंडही तेवढाच भरावा लागेल. म्हणजेच आपण पाच लाख रुपये रोकड स्वरूपात घेतली असेल तर तेवढीच रक्कम दंडापोटी भरावी लागेल.

काय करावे?

मित्र आणि कुटुंबांना उसने किंवा कर्ज देणे हा एक भावनात्मक निर्णय आहे. त्यामुळे ही बाब आणखीच अडचणीची ठरू शकते. उसने पैसे देणे हे आपल्या प्राप्तिकर कायद्यावरही परिणाम करू शकते. जेव्हा आपल्याला उसने पैसे परत मिळतील, तेव्हा ती रक्कम अधिक असेल आणि या स्थितीत बँक आपल्याला त्याचे कारण विचारू शकते. यापासून बचाव करण्यासाठी आपण उसने पैसे देताना एक करार करायला हवा. यावर उसण्या पैशाची रक्कम, परत देण्याची तारीख आणि अटी तसेच अन्य विवरण असावे. त्यामुळे भविष्यात पैसे जमा करताना बँकेला या कराराची प्रत दाखविता येईल.

या गोष्टी लक्षात ठेवा

आपण मित्र किंवा नातेवाईकांना कुवतीनुसारच उसने पैसे द्यावेत. समोरील व्यक्ती अधिक पैसे मागत असेल तरीही आपण आपल्या क्षमतेएवढेच पैसे देणे हिताचे राहू शकते.

उसने पैसे देण्याची क्षमता आणि नातेवाईक व मित्रांची गरज यात जे कमी वाटते, तेवढीच रक्कम द्यावी.

उसने पैसे देताना समोरील व्यक्तीला मागणीचे कारणही विचारावे. ते कारण संयुक्तिक वाटत असेल तरच पैसे द्यावेत. जर समाधान वाटत नसेल तर उसने पैसे देण्याचे टाळावे. शिक्षणाचा खर्च, मुलीच्या लग्नासाठी खर्च, आरोग्य उपचार ही कारणे संयुक्तिक ठरतात. परंतु; फिरायला जाणे, मौजमजा करणे यासाठी पैसे मागितल्यास फेरविचार करणे योग्य राहील.

केवळ एका साध्या कागदावर करार करून सह्या घेणे आणि उसने पैसे देणे जोखमीचे ठरू शकते. कारण, यामुळे पैसे बुडण्याचीच शक्यता अधिक राहते. अशा प्रकारे रक्कम देऊन आर्थिक नुकसान सहन करावे लागेल.

उसनवारीचे पैसे देताना एक किंवा दोन साक्षीदार सोबत असावेत. एकट्याने पैसे देण्याचे टाळावे. ऑनलाईन ट्रान्सफर केल्यास पैसे दिल्याचा पुरावा असतो.

उसने पैसे घेणार्‍या व्यक्तीची आर्थिक क्षमतादेखील पाहणे तितकेच महत्त्वाचे. नोकरदार, व्यावसायिक असेल तर उसने पैसे परत मिळण्याची शक्यता राहते. नोटरीच्या सह्यानिशी उसनवारीचा व्यवहार केल्यास कायदेशीर पुरावा हाताशी राहतो.

सत्यजित दुर्वेकर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news