Latest

सातारा : बाळासाहेबांनी करून दाखवलं…

backup backup

फक्त कराड उत्तरचे पालकमंत्री, कराड तालुक्यात बाळासाहेब पाटलांचा दबदबाच नाही, बाळासाहेब अपघाताने मंत्री झाले आहेत, त्यांना साखर कारखान्या शिवाय काही कळत नाही, या आणि अशा अनेक टीकाटिप्पणी आणि टोमण्यांना सामोरे गेलेले सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मिळवलेला विजय मी पण काय कमी नाही, पन्नास वर्षे कराड तालुक्याचे राजकारण आणि सलग 42 वर्षे नगराध्यक्ष म्हणून काम पाहिलेल्या पी.डी.पाटील यांचा पुत्र आहे, असे जणू काही दाखवून दिले आहे. बाळासाहेब पाटील कराड सोसायटी गटातूनच का उभे राहिले आणि ते का जिंकले याची अनेक कारणे आहेत. मात्र, यामध्ये सर्वात महत्त्वाचं कारण त्यांना कराड तालुक्याचा प्रमुख नेता व्हायचं होतं आणि त्यांनी ते या निकालातून सिद्ध करून दाखवलं आहे !

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीला या वर्षी फार महत्त्व आले. या अगोदर गेल्या अनेक निवडणुका दरम्यान पालकमंत्री एक तर अजित पवार राहिले होते किंवा रामराजे नाईक निंबाळकर किंवा आणखी कोणी. या सर्व नेत्यांनी त्या काळात विलासराव उंडाळकर यांना हाताशी धरून जिल्हा बँकेच्या निवडणुका लढवल्या होत्या, जिंकल्या होत्या. मात्र, ही पहिली निवडणूक होती ज्या निवडणुकीत विलासराव पाटील-उंडाळकर नव्हते. सलग नऊ टर्म जिल्हा मध्यवर्ती बँकेत निवडून जाण्याचा विक्रम विलासराव पाटील यांच्या नावावर आहे. हा विक्रम फक्त उपस्थिती पुरता नाही तर या कालावधीत त्यांनी सातारा जिल्हा बँक टॉपला नेऊन ठेवली. जानेवारी 2021 मध्ये काकांचे निधन झाले.

दरम्यान दोन वर्षांपूर्वी ठाकरे सरकार आल्यानंतर बाळासाहेब पाटील सहकार मंत्री झाले, पुढे पालकमंत्री झाले. या अगोदरच्या दोन निवडणुकांमध्ये जिल्हा बँकेत जाण्यासाठी बाळासाहेब पाटलांना संघर्ष करावा लागला होता. एकदा पक्षाच्या खातिर पराभव समोर दिसत असून सुद्धा उदयनराजेंच्या विरोधात लढावे लागले होते. तर गेल्या निवडणुकीत गप्प बसवून नंतर स्वीकृत संचालक म्हणून त्यांची बोळवण करण्यात आली होती. हे करताना त्यांना पद्धतशीर पद्धतीने राष्ट्रवादीने बाजूला ठेवले होते. मात्र यावेळी बाळासाहेब पाटील स्वतः पालकमंत्री असल्यामुळे निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती. ना. रामराजे नाईक निंबाळकर, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. मकरंद आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेचा कारभार गेल्या पाच वषार्ंत चांगला झाला. तिघेही सुरुवातीपासून एकत्र आहेत आणि होते. बाळासाहेब पाटील पालकमंत्री झाले म्हणून त्यांना जिल्हा बँकेच्या उमेदवार निवड प्रक्रियेत फारसे महत्त्व येणार नाही असं पद्धतशीर पूर्वक नियोजन करून डाव आखला गेला. विलासराव पाटील -उंडाळकर आणि रामराजे नाईक निंबाळकर यांचे संबंध चांगले होते. खरंतर मनात आणलं असतं तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि खासदार शरद पवार यांच्याशी 'मनापासून' दुबार चर्चा करून ना. निंबाळकर हे उदयसिंह पाटील यांचे मन वळवू शकले असते किंवा बाळासाहेब पाटील यांना पर्यायी जागा देऊ शकले असते.

सातारा जिल्ह्याच्या राजकारणात कराडचे सुरुवातीपासूनच असणारे मोठे स्थान कमी करण्यासाठी गेल्या दहा-पंधरा वर्षांत फार मोठा प्रयत्न झाला. मात्र, नियतीने 2010 साली पृथ्वीराज चव्हाण यांच्या रूपाने कराडला मुख्यमंत्रिपद दिले. त्यानंतर भाजप सरकार आल्यानंतर डॉ. अतुल भोसले, शेखर चरेगावकर यांच्या माध्यमातून सत्ताकेंद्रे कराडलाच राहिली. दोन वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत भाजपमध्ये गेलेले शिवेंद्रराजे निवडून आले, मात्र शरद पवार यांचे जवळचे शशिकांत शिंदे पराभूत झाले. मकरंद पाटील हे निवडून आले मात्र त्यांचा अनुभव बाळासाहेब पाटील यांच्यापेक्षा कमी असल्यामुळे बाळासाहेब पाटील यांना मंत्रिपद मिळाले आणि पुन्हा एकदा सत्ता केंद्र कराडला आले. मात्र असे असूनही राष्ट्रवादीच्या या जिल्हा टीमने कधीही बाळासाहेब पाटील यांना स्वतंत्रपणे काम करू दिले नाही.

ना. बाळासाहेब पाटील यांची छाप पडू लागली तर आपली इमेज कमी होईल यासाठी भरपूर प्रयत्न झाले. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत बाळासाहेब पाटील हे सोसायटी मतदार संघातूनच कशी निवडणूक लढतील, त्यांच्यासमोर उदयसिंह पाटील कसे उभे राहतील याचं नियोजन राष्ट्रवादी मधील दिग्गजांनी केलं. कराडचा वाद मिटवण्या ऐवजी पेटवण्याचा प्रयत्न झाला. परंपरा आणि वारसा या जिद्दीला पेटलेल्या उदयसिंह पाटील यांनी सोसायटी मतदारसंघातून पहिल्यांदा अर्ज भरला आणि बाळासाहेब पाटील यांना शह देण्याचा प्रयत्न केला. बाळासाहेब पाटील यांनीही या दबावाला न झुकता याच गटातून उभे राहण्याचा निर्णय जाहीर केला.

गेली नऊ टर्म कराड तालुका सोसायटी मधून प्रतिनिधित्व करणार्‍या विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या चिरंजीवांच्या विरोधात निवडणूक लढवताना बाळासाहेब पाटील यांनी सुरुवातीपासूनच केलेला अभ्यास आणि त्यांचे बंधू जयंत पाटील यांच्यासहित एकनिष्ठ कार्यकर्त्यांची साथ महत्त्वाची होती. याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे निश्चित केले असल्यामुळे त्यांनी निवडणुकी अगोदरच तीन महिने सर्व मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. कोणता मतदार कोणाचा आहे? कुठे विकू, झुकू शकतो? कुठे स्ट्राँग होऊ शकतो? या मतदाराचा वीक पॉईंट कोणता? हा कुणाचे नेतृत्व मानतो इथपासून तो कुणाचा पाहुणा आहे? त्याचा कोणी नातेवाईक कुठल्या ठिकाणी नोकरीला आहे? त्याच्यावर कोणत्या पद्धतीने दबाव टाकता येईल किंवा मदत करता येईल? याचा 'कराड उत्तर पॅटर्न' नुसार अभ्यास बाळासाहेब पाटील गटाने केला होता.

बाळासाहेब पाटील यांचे समर्थक हे त्यांच्या सोबतच राहणार होतेच. आ. पृथ्वीराज चव्हाण यांना मानणारे मतदार उघडपणे उदयसिंह पाटील यांना मदत करणार नव्हते. पृथ्वीराज चव्हाण आणि उदयसिंह पाटील यांच्यातील मनोमिलन किती मनापासून झालेले आहे याचा अभ्यास बाळासाहेब पाटील यांना होता. कराड तालुक्यातील गावागावांत गेल्या दोन वर्षात नेटवर्क अधिक मजबूत करून उत्तर मतदार संघाप्रमाणे बाळासाहेब पाटील यांनी दक्षिणेत आपला एक माणूस गावागावांत तयार केला होता.

बाळासाहेब पालकमंत्री आहेत, सहकार मंत्री आहेत ते निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतात म्हणजे काहीतरी त्यांच्याकडे 'स्ट्राँग पॉईंट' असणार, असा प्रचार कराड तालुक्यात सुरुवातीपासूनच झाला. छत्रपती उदयनराजें विरोधात जिल्हा बँकेत पक्षाने त्यांच्यावर लादलेल्या उमेदवारीमुळे झालेला पराभव वगळता बाळासाहेब कधीही पराभूत झालेले नाहीत. गेली अनेक वर्षे त्यांनी कराड दक्षिणच्या राजकारणात फारसा रस घेतला नव्हता. कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीतही त्यांचा फारसा सहभाग नसतो. कुणालाही न दुखावण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे सहसा त्यांचा नवीन राजकीय विरोधक तयार होत नाही. त्यांचे परंपरागत काही विरोधक आता त्यांच्यासोबत काम करत आहेत. मात्र बाळासाहेब पाटील यावेळी दक्षिण मधील सर्व घटकांचा अभ्यास करून या निवडणुकीला सामोरे गेले.

ज्येष्ठ नेते पी.डी.पाटील यांच्या घराचे एक फारमोठे शल्य आहे. एवढे मोठं राजकीय आणि विकासात्मक काम करूनही यशवंतराव चव्हाण साहेबांच्या बरोबर असून सुद्धा विलासराव पाटील यांच्या राजकीय प्रभावामुळे त्यांना कराड तालुक्याचे नेते होते आले नव्हते. किंबहुना ज्येष्ठ नेते पी.डी.पाटील यांनी कराड शहर आणि उत्तर या पलीकडे जाऊन जास्त पाहिले नव्हते. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर बाळासाहेब पाटील यांनी सह्याद्री कारखाना कार्यक्षेत्र असलेल्या सातारा, कोरेगाव आणि खटाव तालुक्यात विधानसभा निवडणुकीपुरते लक्ष घातले. पुढे त्यांचा तिथे गट निर्माण झाला. मात्र या तालुक्यातील राजकारणात त्यांनी कधीही ढवळाढवळ केली नाही. उंडाळकर आणि पी.डी.पाटील गटाचे अनेक वर्षे अनेक निवडणुकीमध्ये सख्य राहिले. मात्र ते मनापासून नव्हते. परिस्थितीनुसार निर्णय घेऊन ज्येष्ठ नेते पी.डी. पाटील आणि विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या गटाने त्या -त्या वेळी पंचायत समिती, बाजार समिती या सत्ता ताब्यात घेतल्या होत्या. काकांनी दक्षिणेतील आपले पाय मजबूत करताना मोहिते- भोसले यांच्यामध्ये भांडणे लावत सतत मोठा विरोधक तयार होऊ दिला नव्हता. त्यामुळे ते सलग विधानसभेत जाऊ शकले. राज्यात असणारा दरारा कायम ठेवत बँकेच्या माध्यमातून काका नेहमी जिल्ह्याचे नेते म्हणून कार्यरत राहिले.

सह्याद्री कारखाना आणि माझे शहर एवढाच विचार तसेच सोयीचे आणि तडजोडीचे राजकारण करत असल्यामुळे पी.डी. साहेब यांना कधीही जिल्ह्याच्या राजकारणात जावसं वाटलं नाही. मात्र त्यांच्या निधनानंतर बाळासाहेब पाटील यांनी कराड तालुक्याच्या राजकारणात आपली पावले भक्कम करण्यास सुरुवात केली. कृष्णा कारखानाच्या निवडणुकीत बाळासाहेब पाटील तटस्थ राहत अप्रत्यक्षरीत्या त्यांनी अतुल भोसले यांना पाठिंबा दिला. अतुल भोसले यांचा तीन वेळा झालेला पराभव कुणामुळे झाला हे सर्व जिल्ह्याला माहीत आहे. पहिला पराभव थेट बाळासाहेब पाटलांनी केला. दुसर्‍या दोन पराभवाला बाळासाहेब पाटील थेट जबाबदार नसतील पण कराड दक्षिणमधील बाळासाहेब पाटील यांचा गट अतुल भोसले यांच्या सोबत राहिला असता तर कदाचित चित्र वेगळे दिसले असते. या जरी जर-तरच्या गोष्टी असल्या तरी कराड दक्षिण राजकारणात जिकडे बाळासाहेब पाटील तिकडे विजय
नक्की होऊ शकतो अशी सध्याची परिस्थिती आहे.

दुसरीकडे पृथ्वीराज चव्हाण यांच्या घराण्यासोबतही बाळासाहेब पाटील यांचे फारसे सख्य राहिलेले नाही. गेल्या दहा वषार्ंत बदलत्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब पाटील जरी एकत्र दिसले असले तरीही या गटातील दुरावा वेळोवेळी दिसला आहे. कराड नगरपालिकेच्या गत निवडणुकीवेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी सुभाषराव पाटील यांच्या विरोधात केलेला प्रचार आणि लोकशाही आघाडीचा झालेला मानहानीकारक पराभव बाळासाहेब पाटील गट अजूनही विसरलेला नाही. पृथ्वीराज चव्हाण गट आणि उदयसिंह पाटील यांचा गट एकत्र आलेला असला तरी कार्यकर्त्यांमधील कुजबुज काय आहे याची माहिती घेत बाळासाहेब पाटील यांनी कराड तालुक्यातील राजकारणाचा चांगला अभ्यास केला. या अभ्यासाच्या जोरावरच ते जिल्हा बँकेच्या निवडणुकीला सामोरे गेले.

जिल्हा बँकेची निवडणूक सोपी नसते. सोसायटी मतदारसंघातून निवडून जायचं असेल तर तेवढी ताकद आपल्याकडे आहे का? गेल्या दोन निवडणुकीमध्ये आपल्याला किती मते मिळाली होती? याचा अंदाज घेतानाच उदयसिंह पाटील यांच्या विरोधातील सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्यात ते यशस्वी झाले. उदयसिंह पाटील हे काँग्रेसचे उमेदवार आहेत असा प्रचार सुरुवातीपासूनच करण्यात आला. मात्र काँग्रेसचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या सहीत कोणीही नेता उदयसिंह पाटील यांच्या प्रचारासाठी कराड तालुक्यात कुठेही फिरताना दिसला नाही. पृथ्वीराज चव्हाण यांना मानणारी जी काही मते मते होती ती मते सुद्धा आपल्याकडे खेचून घेण्यात बाळासाहेब पाटील यांचे बंधू यशस्वी झाले. उदयसिंह पाटील यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाकडे मदत मागितली नाही, असे पृथ्वीराज चव्हाण यांचे कार्यकर्ते आता बोलून दाखवत आहेत. हे जरी खरे असले तरी काँग्रेस प्रेमी अनेक व्हाट्सअ‍ॅप ग्रुप वरती बाळासाहेब पाटील यांच्यावर खालच्या शब्दात जोरदार टीका झाली. फक्त या ग्रुपवरच हे दोन गट एकत्र असल्याचे दिसले. प्रत्यक्षात उंडाळकर गट आणि पृथ्वीराज चव्हाण यांचा गट जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून कुठेही एकत्र काम करताना कोणालाही दिसला नाही. याची कारणेही वेगळी आहेत.

पृथ्वीराज चव्हाण यांना कराड तालुक्याच्या राजकारणात तसा फारसा इंटरेस्ट नाही. त्यांना दक्षिण सोडून दुसरीकडे जायचे नाही. दक्षिणमध्ये 'सध्या तरी' ते सेफ आहेत. दक्षिणमध्ये निवडून यायचे असेल तर बाळासाहेब पाटील गटाची मदत लागणार आहे किंबहुना बाळासाहेब पाटील यांच्या गटाच्या मदतीमुळेच ते 2019 च्या निवडणुकीत निवडून आलेले आहेत. त्यामुळे उघड प्रचार करून मने दुखावण्यापेक्षा जिल्हा मध्यवर्ती बँकेतील मला काही कळत नाही असे बोलून ते या निवडणुकीपासून लांब राहिले. त्यांना या निवडणुकीपासून दूर ठेवण्यासाठी सुद्धा बाळासाहेब पाटील गटाने चांगलेच लॉबिंग केल्याची चर्चा आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांना मानणारी काही मते जर पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले असते तर कदाचित उदयसिंह पाटील यांना मिळू शकली असती. मात्र, उदयसिंह पाटील यांनी तशी मदतच मागितली नाही, असे पृथ्वीराज चव्हाण यांचे कार्यकर्ते खासगीत बोलून दाखवत आहेत. मात्र, हे सगळं घडूच नये यासाठी बाळासाहेब पाटील यांच्यासह त्यांच्या बंधूनी खेळलेल्या खेळी यशस्वी झाल्याचे निकालावरून लक्षात येते. खरेतर उदयसिंह पाटील सोसायटी मतदारसंघातून उभे राहिले नसते तर बाळासाहेब पाटील दक्षिणेतल्या गावागावांत पोहोचू शकले नसते. ही झाली एक बाजू. मात्र उदयसिंह पाटील हे एकाकी लढले. त्यांना मिळालेली मते पाहिली तर त्यांची मते त्यांच्यासोबत आहेतच हे स्पष्ट होते. पराभवानंतर ते स्वतः यावर आत्मचिंतन करतीलच!

बाळासाहेब पाटील यांनी त्यांचे कट्टर विरोधक अतुल भोसले यांच्या गटाची जुळवून घेतले, ही या निवडणुकीला सुरुवातीला मिळालेली एक वेगळी कलाटणी होती. अतुल भोसले यांच्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँक, बाजार समिती किंवा नगरपालिका फारसे महत्त्वाचे नाही. त्यांना काही करून फक्त विधानसभेत जायचं आहे आणि विधानसभेत जाण्याचा मार्ग 'मंगळवार पेठे'तून जातो याची त्यांना चांगली जाणीव आहे. उदयसिंह पाटील किंवा पृथ्वीराज चव्हाण हे कराड दक्षिणचे येणार्‍या निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार असू शकतात. या दोन्ही उमेदवारांविरोधात उभे राहताना बाळासाहेब पाटील यांना आता मदत केली तर भविष्यात फायदा होऊ शकतो, या दूरद़ृष्टीतून अतुल भोसले यांनी बाळासाहेब पाटील यांच्याकडे मदतीचा हात पुढे केला.

बाळासाहेब पाटील यांना मिळालेली मते पाहिली तर अतुल भोसले यांची मदत त्यांना किती फायद्याची ठरली आहे हे स्पष्ट होते. या निकालामुळे बाळासाहेब पाटील यांचा कराड तालुक्यातील दरारा वाढला आहे. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी जिल्हा बँकेत येण्यासाठी वेगळे पर्याय देऊ केले होते, मात्र थेट सोसायटीतूनच लढायचे आहे, असा आग्रह बाळासाहेबांनी करण्याचे कारण त्यांना जिंकून कराड तालुक्यावर आपला होल्ड आहे हे सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना दाखवायचे होते. बाळासाहेब पाटील ठासून या निवडणुकीत जिंकले. या निकालामुळे भविष्यात अनेक राजकीय स्थित्यंतरे होणार आहेत. काँग्रेसचं काय होणार, काँग्रेस काय करणार ? कराड तालुक्यात भविष्यात निवडणुका कशा होणार? हे पाहण्यासाठी येणार्‍या काळाची वाट पहावी लागेल.

हेही वाचलत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT