Latest

पुणे: इंदापुरात विसावला वैष्णवांचा मेळा

अमृता चौगुले

जावेद मुलाणी

इंदापूर (पुणे), पुढारी वृत्तसेवा: जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील लाखो वारकऱ्यांच्या भक्तिमय वातावरणात इंदापूर शहरातील कस्तुराबाई श्रीपती कदम महाविद्यालयाच्या प्रांगणातील मानाचे दुसरे गोल रिंगण आटोपून गुरुवारी (दि. २२) दुपारी एकच्या सुमारास हा पालखी सोहळा औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील भव्य सभा मंडपात मुक्कामासाठी विसावला.

इंदापूरकरांनी केलेल्या भव्य स्वागत समारंभानंतर वारकरी रिंगण सोहळ्यात आनंदाने धावले. आलेला थकवा अश्वांच्या टापाखालची माती कपाळी लावताच उत्साहाने नाचू लागत होते. विठूनामाचा गजर करून अवघी इंदापूरनगरी दुमदुमून गेली होती. पालखी सोहळा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मैदानातील भव्य सभामंडपात विसावताच माजी आमदार विलास लांडे, इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील, कर्मयोगी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, इंदापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे यांच्या हस्ते श्री तुकोबारायांच्या पादुकांची आरती करण्यात आली. त्यानंतर हजारो भाविकांनी दर्शनासाठी रांग लावून दर्शन घेण्यात सुरुवात केली.

अहंकाराचा वारा । न लागो राजसा । माझिया विष्णुदासा भाविकांसी । ही संतमंडळी सुखी असो ।। या अभंगाच्या ओळीप्रमाणे जागोजागी वारकऱ्यांच्या वागण्या-बोलण्याची अनुभूती लोक घेत होते. वैष्णवांची सेवा घडावी यासाठी अनेक इंदापूरकर वारकऱ्यांना आपल्या घरी स्नेहभोजन करण्यासाठी घेऊन जात होते. विविध संस्था, संघटना यांनी जागोजागी वारकऱ्यांसाठी चहा, पाणी, नाश्ता, जेवण आदींची सोय केली होती. पालखी सोहळा विसावल्यानंतर दुपारचे जेवण करून अनेक ठिकाणी कीर्तनांमध्ये भक्तिमय वातावरणात इंदापूरकर रमल्याचे दिसून येत होते. टाळ-मृदंग, पखवाज यांचा आवाज शहरभर लयबद्ध पद्धतीने पसरल्याने एकच नाद सर्वांच्या कानी पडत होता. इंदापूर शहराच्या प्रशासकीय भवनाशेजारील मैदानात मनोरंजनासाठी मोठे पाळणे, घरगुती उपयोगासाठीच्या वस्तूंचे स्टॉल, महिला, लहान मुले यांच्यासाठी वस्तूंचे वेगवेगळे स्टॉल लावून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विक्रेत्यांची लगबग दिसत होती.

विसावा बदलल्याने पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी इंदापूरकर मुकले

इंदापुरातील अनेक वर्षांची परंपरा असणाऱ्या शहरातील नारायणदास रामदास हायस्कूल येथील मुक्कामाचे स्थळ बदलून यावर्षी प्रथमच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मैदानात मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे इंदापूर शहरात येणारा पालखी सोहळा हा अकलूज नाका येथूनच मुक्कामाच्या ठिकाणाकडे गेल्याने शहरात जागोजागी होणारे स्वागत यावर्षी शहरवासीयांना मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन करावे लागले. पालखी मुक्काम शहराबाहेर असल्याने शहरामध्ये तुरळक ठिकाणी गर्दी दिसत होती.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT