पुढारी ऑनलाईन डेस्क : ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांचा मृत्यू उपचारातील हलगर्जीपणामुळे झाला आहे, असा दावा लेखक संजय सोनवणी यांनी केला आहे. सोनवणी यांनी संबंधित डॉक्टरांवर गुन्हा नोंद करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. प्रा. नरके यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. प्रा. नरके आणि सोनवणी यांच्यातील काही महिन्यांपूर्वी व्हॉटसअपवर संवाद झाला होता. त्याचे स्क्रीनशॉट सोनवणी यांनी त्यांच्या फेसबुकवर शेअर केले आहेत.
मुंबईतील एका खासगी रुग्णालयात नरके यांच्यावर उपचार सुरू होते. पण या दवाखान्यातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे १० महिने त्रास सहन करावा लागला, असे नरके यांनी म्हटल्याचे या संवादात दिसते. या डॉक्टरांनी रिपोर्ट नीट पाहिले नाहीत, त्यामुळे हार्टऐवजी नसलेल्या अस्थमावर उपचार करत राहिले, असेही नरके यांनी यात म्हटले आहे. रिपोर्टमध्ये हार्टफेलचा धोका आठ पट आहे, असे नोंदवले असतानाही डॉक्टरांनी ते वाचलेच नाही, त्यामुळे हा धोका पुढे २१ पट झाला, असेही त्यांनी म्हटले होते.
या संदर्भात सोनवणी म्हणतात, "नरके यांच्यावर १० महिने चुकीचे औषधोपचार झाले, यामुळे त्यांचा मूळ आजार बळावला आणि हरीभाऊ अकाली गेले. त्यांचा मृत्यू सदोष मनुष्यवधाचा प्रकार आहे. दोषी डॉक्टर्सवर कारवाई का होऊ नये?"
हेही वाचा