

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मराठीचा अभिजात दर्जा जसा जवळ येतो, तेव्हा मराठी माणसांमधीलच काही माणसे पेटून उठतात. अभिजात दर्जाचा विषय हा माझा व्यक्तिगत विषय नाही. आम्ही तळमळीने आणि कळकळीने विषय घेऊन काम करत आहोत, यात मराठी लोकांचे आशीर्वाद आहेत. अभिजात दर्जाच्या विरुद्ध मत असेल तर असूद्या. पण, संपूर्ण प्रकल्पच उधळून लावायचा हे बरोबर नाही. अभिजात दर्जा ही लढाईच मुळात राजकीय आहे. हा दर्जा केवळ गुणवत्तेवर मिळाला असता तर 8 वर्षे अभिजात दर्जा मिळायला लागले नसते, अशी खंत ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत प्रा. हरी नरके यांनी गुरुवारी व्यक्त केली.
सृष्टी संस्थेच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात प्रा. नरके बोलत होते. मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित, संस्थेचे संस्थापक प्रशांत कोठडीया आदी उपस्थित होते. प्रा. नरके म्हणाले, आज मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठीचा अहवाल सर्वानुमते मंजूर होऊन 8 वर्षे झालेली असतानाही त्याला विरोध करणार्यांची कमतरता नाही.
तुम्ही मतभेद नोंदवा, तुम्ही टीका करा. विरोध करा, त्याची गरज आहे. त्यामुळे भिन्न मतांचे नेहमी स्वागत आहे; परंतु जातीधर्मावरून टिंगलटवाळी का आणि कशासाठी? आज अभिजात दर्जाची मोठी लढाई आपण जिंकलो आहोत. फक्त घोषणा कधी होईल, याला कालमर्यादा नाही. मुलांची मराठीशी असलेली नाळ तोडू नका. त्यासाठी/इ मराठी सक्तीचे, मराठी विद्यापीठ/इ झाले पाहिजे, असे मत डॉ. दीक्षित यांनी व्यक्त केले.
प्रा. नरके म्हणाले…
मराठीतून रोजगारक्षमता वाढवली पाहिजे, त्यासाठी अभिजात दर्जा महत्त्वाचा.
दर्जामुळे साडेचारशे विद्यापीठांत मराठी शिकविण्यासह येथे मराठीसाठी प्राध्यापक नेमण्यास प्रारंभ होईल.
मराठी वाचनसंस्कृती, मराठी ग्रंथ प्रकाशन, मराठी शाळांचा दर्जा या सगळ्यांवर परिणाम होईल.