Latest

Shirala Nagpanchami Yatra: शिराळ्यात हजारो भाविकांच्या उपस्थितीत नागपंचमी यात्रा उत्साहात

अविनाश सुतार


शिराळा : शिराळ्याची जगप्रसिद्ध आणि शेकडो वर्षाची परपंरा असणारी नागपंचमी यात्रा आंबाबाईच्या नावानं चांगभलंच्या गजरात  हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात आज (दि.२१) पार पडली. पावसाने उघडीप दिल्याने डीजेच्या ठेक्यावर तरूणाईने जल्लोष केला. कच्चाड युवा शक्तीचे नगरसेवक केदार नलवडे यांच्या मंडळात सिनेअभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांची उपस्थिती यात्रेचे खास आकर्षण ठरले. रात्री उशीरापर्यंत मिरवणुका सुरू होत्या. (Shirala Nagpanchami Yatra)

 अंबामाता दर्शनासाठी पहाटे पाचपासून भाविकांच्या रांगा

ग्रामदैवत अंबामाता दर्शनासाठी आज पहाटे पाचपासून भाविकांनी रांगा लावल्या होत्या. अनेक वर्षे जिवंत नागाच्या पुजेची परपंरा जोपासणाऱ्या शिराळकरांनी कायद्याचे पालन करत जिवंत नागाऐवजी नाग प्रतिमेचे व घरोघरी मातीच्या नागाची पूजा करून नागपंचमी साजरी केली. कायद्याचे उल्लंघन होवू नये, यासाठी दोन दिवसांपासूनच पोलीस व वन यंत्रणा सज्ज होती.

सकाळी 70 नागमंडळे, कार्यकर्ते विविध वाद्यांच्या ताफ्यासह प्रतिकात्मक नाग घेऊन ग्रामदेवता अंबामाता मंदिरात पोहोचले. त्या ठिकाणी पूजा झाल्यानंतर अंबामाताच्या दर्शनानंतर कार्यकर्ते आपल्या गल्लीत पोहचले. घराघरातून गृहिणींनी भक्तिभावाने मातीच्या नागाची, लाह्या, दुर्वा, कापसाचे वस्त्र आदी साहित्यासह विधीवत पूजा केली.

पांडुरंग उर्फ प्रमोद महाजनांच्या घरात मानाच्या पालखीचे पूजन

दुपारी बाराच्या सुमारास पांडुरंग उर्फ प्रमोद महाजनांच्या घरात मानाच्या पालखीचे पूजन करण्यात आले. त्याचे पौरोहित्य बंडा जोशी यांनी केले. यावेळी कोतवाल, डवरी, भोई आदी मानकरी उपस्थित होते. यावेळी मानाच्या नागराज याचा मुखवटा आणि मानाचा सराफ यांनी दिलेल्या नाग प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर नाग प्रतिमेच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला. मिरवणूक नायकूडपूरा येथून गुरूवार पेठ, कुरणे गल्ली, सोमवार पेठ आंबामाता रोडमार्गे काढण्यात आली.

Shirala Nagpanchami Yatra : वन विभाग व पोलीस बंदोबस्त तैनात

शिराळा शहरात व आंबामाता मंदिर परिसरात वन विभाग व पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मुख्य वनसंरक्षक रामनुजम, दिलीप भुरके, उपवनसंरक्षक नीता कट्टे, वनक्षेत्रपाल म्हतेश बगले यांच्या मार्गदर्शनाखाली १३५ अधिकाऱ्यांसह कर्मचारी नियुक्त केले होते. तसेच ३२ गल्ल्यांमध्ये प्रत्येक गल्लीसाठी ४ व उर्वरित ४ गल्ल्यांमध्ये १ पथक असे ६ पथके नियुक्ती केली होती. तसेच ७ ठिकाणी तपासणी नाके होते. ६० नागराज मंडळावर देखरेख ठेवण्यासाठी विशेष बंदोबस्त होता.

पोलीस बंदोबस्तासाठी ५०० अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती केली होती. एक पोलीस उपअधीक्षक, १४ पोलीस निरीक्षक, ३५ सहायक पोलीस निरीक्षक, ६० महिला अंमलदार, ४४ वाहतूक पोलीस कर्मचारी, तर ३३० पोलीस पुरुष अंमलदार यांची नियुक्ती करण्यात आली होती. तर १६ व्हिडीओ कॅमेरे, १२ ध्वनी मापक यंत्रे, सीसीटीव्ही कॅमेरे ठेवण्यात आले होते.

Shirala Nagpanchami Yatra : शिराळा एसटी आगाराकडून ७३ बसेस सोय

प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसिलदार शामल खोत- पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण व मनीषा कदम, राहुल चव्हाण, पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम, सहायक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त होता. यात्रेनिमित्त शिराळा एसटी आगाराकडून ७३ बसेस सोय केली होती. महावितरणचे सहायक अभियंता एल. बी. खटावकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी पथके नेमली होती.

७ वैद्यकीय पथके व ३२ फिरती वैद्यकीय पथके तैनात

आरोग्य विभागाने तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पाटील व डॉ. एन. बी. कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली ७ वैद्यकीय पथके व ३२ फिरती वैद्यकीय पथके ठेवली होती. तसेच उपजिल्हा रुग्णालयात आपत्तकालीन वैद्यकीय पथक तैनात होते. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने योग्य व्यवस्था ठेवली होती.

यावेळी आमदार मानसिंगराव नाईक, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, भाजप नेते सत्यजित देशमुख, माजी. जि. प. सदस्य सम्राट महाडिक, भगतसिंग नाईक, रणधीर नाईक, विश्वास कदम, ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अभिजीत पाटील, महाडीक युवा शक्तीचे नगरसेवक केदार नलवडे, पृथ्वीसिंग नाईक, रणजितसिंह नाईक, महादेव कदम, किर्तीकुमार पाटील, देवेंद्र पाटील, संतोष हिरुगुडे आदींनी भेटी दिल्या.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT