सांगली : सचिन जाधव ऊर्फ टारझन…पंधरा वर्षांपूर्वी गुन्हेगारीत सक्रिय झालेला… आधी रिक्षाचालक मग सराईत गुंड म्हणून त्याची ओळख झाली. नगरसेवक दाद्या सावंत यांच्या खुनानंतर तो चांगलाच चर्चेत आला. सोमवारी सकाळी त्याचा निर्घृण खून झाल्याने त्याच्या गुन्हेगारी कारनाम्याचा अखेर अंत झाला. (Sangli Crime News)
टारझनविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी, बेकायदा हत्यार बाळगणे, गोळीबार करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. मुख्य बसस्थानकाजवळ तो राहत होता. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आधी तो रिक्षा चालवू लागला. काही वर्षे रिक्षा चालविल्यानंतर तो गुन्हेगारीत सक्रिय झाला. गुन्ह्यांची मालिका रचत गेल्याने सातत्याने तो पोलिसांच्या रेकॉर्डवर आला. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याच्या गुन्हेगारी कारवाया सुरूच असायच्या.
'सिव्हिल' चौकात नगरसेवक दाद्या सावंत यांच्या गोळ्या झाडून खून झाला. या खुनात टारझन मुख्य संशयित निघाला. त्याच्यासह 12 जणांना अटक करण्यात आली. अवघ्या चार महिन्यांत तो जामिनावर बाहेर आला. सावंत टोळीकडून धोका असल्याने तो कर्हाडमधील दिवंगत गुंड सलीम शेख ऊर्फ सल्या चेप्या याच्या आश्रयाला गेला. तिथे त्याने 'वसुली'चे काम सुरू केले.
दाद्या सावंत यांच्या खुनात सल्यालाही अटक झाली. पाच वर्षांपूर्वी सल्याचा आजाराने मृत्यू झाला. त्यानंतर टारझनने त्याच्या टोळीची सूत्रे हाती घेतली. कर्हाड सोडून त्याने पुणे गाठले. तिथे राहून सांगलीतील गुन्हेगारीची सूत्रे हलवू लागला. काही वर्षांपूर्वी तो अहिल्यानगर (कुपवाड) येथे राहण्यास आला. त्याच्याभोवती सातत्याने साथीदारांचा गराडा असायचा.
गुंड राजू पुजारी व सावंत टोळीचा संघर्ष सार्या सांगलीने अनुभवला. पुजारीचा 20 वर्षांपूर्वी पोलिसांनी 'एन्काऊंटर' केला. त्यावेळी त्याचा विश्वासू साथीदार गुंड अकबर अत्तार हाही पुजारीसोबत होता. मात्र पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीवेळ तो पळून गेला. 2008 मध्ये बकरी ईददिवशी अत्तारचा शौचालयात धारदार शस्त्राने हल्ला करून खून केला. या खुनाचा बदला घेण्यासाठी टारझन सुडाने पेटला. यातूनच त्याने सावंत यांचा खून केल्याची माहिती पोलिस तपासातून पुढे आली होती.
सोमवारी सकाळी अहिल्यानगर येथे एका महिलेच्या घरात टारझनचा निर्घृण खून झाल्याने त्याच्या गुन्हेगारी कारमान्याचा अखेर अंत झाला.
सावंत याच्या खुनात कारागृहातून टारझनला न्यायालयात आणले जायचे. त्यावेळी प्रतिस्पर्धी टोळ्याशी त्याचा अनेकदा संघर्ष झाला. काही टोळ्यातील गुन्हेगारांनी त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तेव्हापासून त्याला कडेकोट बंदोबस्तात आणले जात होते. (Sangli Crime News)
हेही वाचा :