सरवडे;पुढारी वृत्तसेवा : मिरजेत बोलेरो आणि ट्रॅक्टरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सहाजण ठार झाले. यापैकी पाचजण जागीच ठार झाले, तर एका महिलेचा रुग्णालयात मृत्यू झाला. रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी सकाळी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. दोघे मृत इचलकरंजीचे, तर अन्य मृत सरवडे (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) गावचे आहेत. दोन जखमी तरुणींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. (Sangli Accident news)
राधानगरी तालुक्यातील सरवडे येथील पोवार कुटुंबीय सुट्टी असल्याने देवदर्शनासाठी पंढरपूरला निघाले होते; पण काळ बनून आलेल्या ट्रॅक्टरने त्यांना गाठले आणि कुटुंबच अपघातात उद्ध्वस्त झाले. या विचित्र अपघातामध्ये सासू, सासू यांचे दीर आणि एका चिमुकल्याने खेळण्या-बागडण्याच्या वयातच जगाचा निरोप घेतला. या अपघाताने पोवार कुटुंबाचे होत्याचे नव्हते झाले.
जयवंत पोवार हे राधानगरी तहसील कार्यालयासमोर स्टॅम्प रायटर म्हणून काम करतात. बुधवारी सकाळी ते सासू, सासू यांचे दीर, पत्नी आणि मुलांसह देवदर्शनासाठी बाहेर पडले. मिरज शहर सोडल्यानंतर विटांनी भरलेला ट्रॅक्टर चुकीच्या दिशेने काळ बनून येत होता; पण याची पुसटशीही कल्पना त्यांना नव्हती. काळाने पोवार कुटुंबीयांवर घाला घातला. यामध्ये जयवंत पोवार यांच्यासह पत्नी स्नेहल पोवार, सातवीत शिकणारा मुलगा सोहम पोवार, सासू कमल शिंदे, नातेवाईक लक्ष्मण शिंदे, तर चालक उमेश शर्मा या सहाजणांचा मृत्यू झाला; तर त्यांच्या दोन मुली साक्षी पोवार आणि श्रावणी पोवार या जखमी झालेल्या आहेत.
ही बातमी सरवडे गावात समजताच गावात सन्नाटा पसरला. परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, सरवडे येथील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले.
पोवार कुटुंबातील आई, वडील, मुलगा यांचा अपघाती मृत्यू झाला. रात्री साडेअकरा वाजता मृतदेह रुग्णवाहिकेतून गावात आणण्यात आले. यावेळी संपूर्ण परिसर सुन्न आणि आक्रोशाने थिजून गेला होता. महिला, पुरुषांच्या अश्रूंचे बांध फुटले होते. अंत्ययात्रेला हजारो लोक उपस्थित होते. स्मशानभूमीत दोन चिता रचण्यात आल्या. एका चितेवर वडील, तर शेजारच्या चितेवर आईजवळ मुलग्याला ठेवण्यात आले होते. अवघ्या बाराव्या वर्षी सोहमला आईच्या कुशीत भडाग्नी देण्यात आला. हे द़ृश्य बघून उपस्थितांपैकी अनेकांना अश्रू अनावर झाले. रात्री बाराला संपूर्ण स्मशानभूमी मुलगा आणि आई, वडिलांच्या एकत्रित ज्वाळांनी गहिवरून गेली. (Sangli Accident news)
हे ही वाचा :