सेनगाव; पुढारी वृत्तसेवा : हिंगोलीच्या जिल्हाप्रमुख पदासाठी चर्चेत असणाऱ्या संदेश देशमुख यांची अखेर जिल्हाप्रमुखपदी निवड झाल्याने शिंदे गटाची डोकेदुखी वाढली आहे. तालुक्यातील शिवसैनिकांकडून देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. शिवसेनेतून शिंदे गटात प्रवेश केलेल्या आमदार संतोष बांगर यांना शह देण्यासाठी शिवसेनेने ही खेळी खेळली असल्याचे दिसून येत आहे.
शिवसेनेसोबत बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी एक गट निर्माण केला. यामुळे बऱ्याच घडामोडी घडलेल्या पहायला मिळाल्या. मात्र गेल्या काही दिवसापासून उध्दव ठाकरेंच्या मूळ शिवसेनेत प्रवेशासाठी मातोश्रीवर रांगा लागल्या आहेत. शिंदे गटातील कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांना शह देण्यासाठी मातोश्रीकडून नवी खेळी खेळण्यात आली आहे.
कळमनुरीचे माजी आमदार संतोष टारफे व शेतकरी नेते अजित मगर यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. तर काही दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केलेले विनायकराव भिसे यांची हिंगोली व कळमनुरी तर वसमत व सेनगाव करीता संदेश देशमुख यांची जिल्हाप्रमुखपदी निवड झाल्याने शिंदे गटाची डोकेदुखी वाढली आहे.
शिवसेनेसोबत झालेल्या बंडानंतर हिंगोलीत संतोष बांगर यांची जिल्हा प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर मला जिल्हाप्रमुख पदावरून हटवण्याचा अधिकार कुणालाच नाही. असं अप्रत्यक्ष उत्तर बांगरांनी उध्दव ठाकरेना दिलं होतं.
कावड यात्रेदरम्यान संतोष बांगर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन केले. त्यामुळे त्यांना अधिक बळ मिळाले होते. परंतु नव्या जिल्हाप्रमुखांची नियुक्ती झाल्यामुळे त्यांची डोकेदुखी वाढणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. सेनगावचे संदेश देशमुख यांना जिल्हाप्रमुख पद मिळाल्यामुळे शहरासह तालुक्यातील शिवसैनिकांकडून जल्लोष साजरा केला जात आहे.