गद्दारांची निवडणुकीला सामोरे जाण्याची हिंमत नाही : उद्धव ठाकरे | पुढारी

गद्दारांची निवडणुकीला सामोरे जाण्याची हिंमत नाही : उद्धव ठाकरे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील जनतेच्या भावना आपल्यासोबत आहेत. लोक सध्या निवडणुकांचीच वाट बघत आहेत. निवडणुका कधी येतात आणि या गद्दारांना आम्ही धडा शिकवतो अशी स्थिती आहे. पण, निवडणुका लवकर घेण्याची यांच्यात हिंमत आहे असे मला वाटत नाही, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर निशाणा साधला.

शिवसेनेतील बंडाळीनंतर एकीकडे सर्वोच्च न्यायालयात आमदारांच्या निलंबनापासून राज्य सरकारच्या वैधतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे, तर निवडणूक आयोगासमोर शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा प्रश्न सुनावणीला येणार आहे. सोमवारी सर्वोच्च न्यायालयात, तर मंगळवारी निवडणूक आयोगासमोर कार्यवाही होणार आहे. या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेवरील दावा सिद्ध करण्यासाठी शिवसेनेने जिल्ह्याजिल्ह्यांतून सदस्य नोंदणी आणि निष्ठेची शपथपत्रे मागविण्याचा धडाका लावला आहे. रविवारी सदस्य नोंदणीची खोकी घेऊन मातोश्रीवर आलेल्या शिवसैनिकांशी उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला.

आपल्या खोक्यात निष्ठेची शपथपत्रे आहेत. त्यांच्या खोक्यात जे आहे ते त्यांना लखलाभ. त्यांच्याकडे सगळीच कामे पैशांनी होतात. माझ्याकडे माझी रक्तामांसाची, जिवाला जीव देणारी माणसे आहेत. तुम्ही सदस्यपत्र घेऊन आलेला आहात तो मी पहिला टप्पा मानतो. कोर्टात काय व्हायचे ते होईल, माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. जनतेच्या भावना आपल्यासोबत आहेत. लोक निवडणुकीची वाट
बघत आहेत. त्यांना ही दलदल बाजूला सारायची आहे. पण, निवडणुका घेण्याची हिंमत हे दाखवतील, असे वाटत नाही असा टोला ठाकरे यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला लगावला.

वेळप्रसंगी मुख्यमंत्र्यांचीही कानउघडणी करावी लागेल

मुंबई : मंत्री असले तरी सभागृहात शिस्तीत वागले पाहिजे, हे तुम्ही खडसावून सांगितले त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. उद्या मुख्यमंत्री जरी तसे वागले तरी त्यांची कानउघडणी करण्याचे काम तुम्हाला करावे लागेल, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांचे रविवारी कौतुक केले. मातोश्री निवासस्थानी उपसभापती नीलम गोर्‍हे यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी सुभाष देसाई, आ. रवींद्र वायकर आदी नेते उपस्थित होते. उपसभापती गोर्‍हे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत मंत्री गुलाबराव पाटील यांची खरडपट्टी काढली होती. हाच संदर्भ देत ठाकरे यांनी गोर्‍हे यांचे कौतुक केले.

राज्यातील महिला अत्याचारांवरही ठाकरे यांनी यावेळी भाष्य केले. आपण फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो. पण अजूनही अशा घटना घडतात. महाराष्ट्रात तरी महिला अत्याचाराच्या घटना घडू नये. त्यात जात-पात-धर्म येता कामा नये. मग ती महिला बिलकिस बानो असो की, भंडार्‍यातील ती पीडिता असो. सर्वच पक्षांनी अशा बाबतीत दया, माया, क्षमा नाही, हे धोरण ठेवले पाहिजे. सगळ्यांनी
एकत्र आले पाहिजे. त्याशिवाय या कोरड्या बोंबलण्याला अर्थ नाही, असे ठाकरे म्हणाले.

Back to top button