पुणे : शिवसेना-संभाजी ब्रिगेड युती राज्याच्या हितासाठी | पुढारी

पुणे : शिवसेना-संभाजी ब्रिगेड युती राज्याच्या हितासाठी

पुणे; पुढारी वृत्तसेवा: ‘देशात धार्मिक दहशतवाद निर्माण केला जात आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र येण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या सर्वांगीण हितासाठी घेण्यात आला असून, मनपा निवडणुका एकत्रित लढू,’ असा निर्धार आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आला. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीने संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेला संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे, महानगराध्यक्ष अविनाश मोहिते, शिवसेना पुणे शहराध्यक्ष संजय मोरे, समाधान थरकुडे, संभाजी ब्रिगेडचे उपाध्यक्ष ज्योतिबा नरवडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

‘सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना येणार्‍या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्येएकत्र करून पुणे महानगरपालिकेवर शिवसेना व संभाजी ब्रिगेडचा भगवा फडकवल्याशिवाय शांत बसणार नाही. शिवसेना व संभाजी ब्रिगेड युती ही महाराष्ट्राच्या हितासाठी झाली आहे. यासाठी सर्व जुन्या व नवीन कार्यकर्त्यांनी जबाबदारी घेऊन कामाला लागावे,’ असे आवाहन संतोष शिंदे यांनी केले. मोरे म्हणाले, ‘देशात सूडाचे राजकारण सुरू आहे. म्हणून संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र मिळून पुण्यात काम करणार आहेत. आम्हाला समृद्ध लोकशाही टिकवण्यासाठी संभाजी ब्रिगेडची ताकद मिळाली आहे. येणार्‍या निवडणुकीत एकत्र मिळून काम करू.’

Back to top button