UK Election Result 2024
कीर स्टारमर File Photo
संपादकीय

UK Election : ब्रिटनमधील सत्तांतर

arun patil

ब्रिटनमधील हुजूर पक्षाच्या (कॉन्झर्व्हेटिव्ह) साम्राज्यावरील सूर्य 14 वर्षांनंतर अखेर मावळला. तेथील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या मजूर पक्षाने अभूतपूर्व यश मिळवले. 650 सदस्यांच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये 410 जागा जिंकून मजूर पक्षाने हुकूमत प्रस्थापित केली. त्यामुळे कीर स्टार्मर हे मजूर पक्षाचे सातवे पंतप्रधान ठरणार आहेत. हुजूर पक्षाला केवळ 120 जागा मिळाल्या असून, लिबरल डेमोकॅ्रटिक पक्षास 71 जागा प्राप्त झाल्या. मूळ भारतीय वंशांचे ऋषी सुनाक पंतप्रधानपदावरून पायउतार होत आहेत. हुजूर पक्षाच्या 218 जागा कमी झाल्या असून, हा त्या पक्षाचा दारुण पराभव मानावा लागेल.

1997 मध्ये टोनी ब्लेअर यांच्या नेतृत्वाखाली मजूर पक्षाने 418 जागा मिळवल्या होत्या. दोन टर्म मिळालेल्या ब्लेअर यांचा तो विक्रम मोडीत काढणे शक्य झाले नसले, तरी स्टार्मर यांनी केलेला भीमपराक्रम काही कमी महत्त्वाचा नाही. सुनाक यांनी त्यांच्या कार्यकाळाचे सहा महिने बाकी असतानाच, मुदतपूर्व निवडणुका घेण्याची घोषणा केली होती. हाऊस ऑफ कॉमन्समध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक सदस्य असतील, त्या पक्षाच्या नेत्यालाब्रिटनच्या राजसिंहासनाकडून सरकार बनवण्याचे आमंत्रण दिले जाते. त्यानुसार आता स्टार्मर यांना ते दिले जाईल. हुजूर व मजूर यांचीच सत्ताब्रिटनमध्ये आलटूनपालटून असते; परंतु ‘स्कॉटिश नॅशनल पार्टी’ हा स्कॉटलंडच्या स्वातंत्र्यासाठी लढतो, तर ‘लिबरल डेमोकॅ्रटस्’ आणि ‘डेमोक्रॅटिक युनियननिस्ट पार्टी’ हे पक्षब्रिटन-उत्तर आयर्लंडमध्ये सहकार्य वाढवावे, या उद्देशाने काम करतात. अलीकडेच हुजूर पक्षातून फुटून अतिउजव्या विचारांच्या लोकांनी ‘रिफॉर्म पार्टी’ पक्ष स्थापन केला.

निगेल फराझ या पक्षाचा नेता असून, त्यामुळेही हुजूर पक्षाचे नुकसान झाले. आर्थिक अस्थिरता, घरांची समस्या, भाववाढ, स्थलांतरितांचे प्रश्न, परराष्ट्र धोरण या सर्व बाबतीत सुनाक सरकारची कामगिरी निराशाजनक राहिली. त्यामुळे सत्तांतर व्हायलाच हवे, अशी स्पष्ट भूमिका घेऊन तेथील प्रतिष्ठित वृत्तपत्रांनी मजूर पक्षाला पाठिंबा दिला होता. स्टार्मर यांची सत्ता आल्यास मध्यमवर्गीय आणि श्रीमंतांवर करांची करवत चालवली जाईल. त्यामुळे त्यांना मते देऊ नका, असा प्रचार सुनाक यांनी केला होता; परंतु मतदारांनी त्यांच्या या आवाहनास प्रतिसाद दिला नाही.ब्रिटनने 2016 मध्ये युरोपियन युनियनमधून (ईयू) बाहेर पडण्याचा (ब्रेक्झिट) निर्णय घेतला. तेव्हापासून तो देश आर्थिक संकटात सापडला. हुजूर पक्षाचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी ब्रेक्झिटला विरोध केला आणि त्यांचे पंतप्रधानपद गेले. त्यानंतर हुजूर पक्षाचे चार पंतप्रधान झाले.

पंतप्रधान थेरेसा मे या ब्रेक्झिटच्या बाजूच्या होत्या; परंतु ब्रेक्झिटची योजना व्यावहारिक स्तरावर अमलात कशी आणायची, ते त्यांना जमलेच नाही. ब्रेक्झिट हाब्रिटनच्या फायद्याचा आहे आणि मी देशाचे हितच साधेन, असे आश्वासन त्यांनी दिले होते; पण त्या ते पूर्ण करू शकल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या जागी बोरिस जॉन्सन यांची निवड झाली. कोरोना काळात अनेक लोकांचा मृत्यू होत होता, तेव्हा बोरिस व त्यांच्या सहकार्‍यांनी कोरोनाविषयक नियमांचा भंग करून पार्टी केली. याखेरीज सग्यासोयर्‍यांचा लाभ करून देणे यासह भ—ष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर झाले. पक्षाला काही उद्योगपतींकडून फायदेही मिळाले. त्यामुळे जॉन्सन यांच्यावर प्रचंड टीका झाली आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. सुनाक यांच्या अगोदर लिझ ट्रस या पंतप्रधान होत्या; परंतु त्या तर केवळ 49 दिवसच सत्तेवर राहू शकल्या. देशात इंधनाचे दर प्रचंड वाढले होते आणि महागाईचा कळस झाला होता. त्यावेळी सुनाक यांनी अर्थसंकल्प मांडला होता. त्यामुळे जनतेची निराशा झाली.

सुनाक यांनी 25 ऑक्टोबर 2022 रोजी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली, तरीही त्यांना आर्थिक आव्हान पेलता आले नाही. तसेच ज्यांच्याकडे अधिकृत कागदपत्रे नाहीत, अशाब्रिटनमधील स्थलांतरितांना रवांडाला धाडण्याचा त्यांचा निर्णय माणुसकीशून्य असल्याची टीका झाली. हवामान बदलांविषयीब्रिटनने आंतरराष्ट्रीय समुदायास दिलेली आश्वासने पूर्ण न केल्यामुळे मजूर पक्षाने सुनाक यांच्यावर हल्लाबोल केला. दुसर्‍या महायुद्धात 6 जून 1944 रोजी ‘ऑपरेशन ओव्हरलॉर्ड’मध्ये दोस्त राष्ट्रांनी सहभाग घेतला आणि त्यामध्ये अमेरिकेबरोबरब्रिटनचाही समावेश होता. या लष्करी मोहिमेद्वारे फ्रान्सची नाझी आक्रमणातून मुक्तता केली होती. या मोहिमेस 6 जून 2024 ला 80 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त झालेल्या कार्यक्रमास अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन व अन्य अनेक जागतिक नेते हजर होते; परंतु त्यास उपस्थित न राहता, त्याच वेळेत सुनाक यांनी टीव्ही चॅनेलला मुलाखत देणे पसंत केले होते, यावरही टीका झाली. सत्तेवर आल्यास आम्ही व्यवस्थेत परिवर्तन करू, असे आश्वासन नियोजित पंतप्रधान स्टार्मर यांनी निवडणूक निकालानंतर दिले आहे.

ब्रिटनमधील लोकांचे जीवनमान घसरले असून, सार्वजनिक सेवांवर कामांचा ताण पडलेला आहे. देशाच्या डोक्यावरील निव्वळ कर्ज प्रचंड वाढले आहे. मी ताबडतोब बदल करू शकणार नाही, असा पूर्वइशारा स्टार्मर यांनी देऊन ठेवला असून, 9.2 अब्ज डॉलर्सचा वेल्थ फंड उभारण्याचे आश्वासन त्यांनी आधीच जाहीरनाम्यात दिले आहे. जेरेमी कॉर्बेन हे मजूर पक्षाचे प्रमुख असताना काश्मीरबाबत आंतरराष्ट्रीय हस्तक्षेप करावा, असे आवाहन त्यांनी केले होते; परंतु स्टार्मर यांनी पक्षाची भारतविरोधी भूमिका पूर्णपणे बदलली आहे.ब्रिटनमध्ये भारतीयांची संख्या मोठी आहे, याची त्यांना कल्पना आहे. त्यामुळे मजूर पक्षाची सत्ता आल्यावर भारताला चिंता करण्याचे कारण नाही. उलट दोन्ही देशांतील मुक्त व्यापार कराराच्या चर्चेस लवकरात लवकर अंतिम स्वरूप दिले गेले पाहिजे. त्याचा दोन्ही देशांना फायदाच आहे. सुनाक पदावरून गेले आहेत. आता स्टार्मर यांच्याकडून भारताला मोठ्या आशा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्टार्मर यांच्या सहकार्यातून उभय देशांचे संबंध वृद्धिंगत होऊ शकतील.

SCROLL FOR NEXT