सध्या आपल्या राज्यामध्ये मराठीवरून रणकंदन माजले आहे. महाराष्ट्रात राहणार्या परप्रांतीयांनी मराठी बोललेच पाहिजे, असा आपला आग्रह आहे. बरेचसे परप्रांतीय ही आग्रही मागणी धुडकावत, काहीही झाले तरी मराठी बोलणार नाही, असे जाहीर करत आहेत. खरं तर मराठी ही अत्यंत गोड भाषा आहे आणि इतर भाषांच्या तुलनेत शिकण्यासाठी अत्यंत सोपी आहे. दोन-तीन पिढ्यांपासून आपल्या राज्यात स्थायिक झालेले परप्रांतीय अस्खलित मराठी नुसते बोलतच नाहीत तर लिहीत पण असतात. मराठी बोलण्याच्या सध्याच्या संघर्षात शिगे नावाच्या एका जपानी तरुणाचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आहे.
हा तरुण मूळ जपानचा असून तो जगभर फिरत असतो. शिगे-जपानी गुरुजी या त्याच्या इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. शिगे हा एक ट्रॅव्हल ब्लॉगर आहे आणि तो जगभरातील विविध देशांमध्ये जातो व तेथील संस्कृती जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. एक जपानी माणूस इतके सहज मराठी बोलू शकतो तर मग परप्रांतीय मराठीत का बोलत नाहीत, असा प्रश्न राज्यामध्ये उभा केला जात आहे. या व्हिडीओमध्ये शिगे अस्खलित मराठी बोलताना दिसतोय. लक्षवेधी बाब म्हणजे मुंबईत फिरत असताना त्याने टॅक्सीवाल्याशी मराठीमध्ये संवाद साधला आहे. हा व्हिडीओ पाहून मराठी माणसे प्रचंड खूश झाली आणि त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. ‘चला मराठीमध्ये बोलूया’ असे म्हणत त्याने आपल्या ब्लॉगची सुरुवात केली आहे. पुढे त्याने टॅक्सीवाल्याला विचारले की, मुंबईत फिरण्यासाठी सर्वात चांगली जागा कुठली आहे? निसर्गरम्य ठिकाणे आहेत म्हणून ड्रायव्हरने त्याला अलिबाग किंवा रायगडला जा, असा सल्ला दिला होता.
पुढे त्या जपानी तरुणाने ड्रायव्हरचे कौतुक करत तुम्ही खूप छान गाडी चालवता, असे म्हटले आहे. यावर आपल्या मराठी ड्रायव्हरने गेली 20 वर्षे गाडी चालवत आहे, अशी माहिती त्याला दिली. यानंतर शिगे विचारतो की, मुंबईमध्ये गाडी चालवणे फार कठीण असेल ना? यावर ड्रायव्हर उत्तर देतो की, बिलकुल नाही. माझ्यासाठी गाडी चालवणे हा डाव्या हाताचा खेळ आहे. या व्हिडीओमधील संभाषण जेमतेम एक मिनिटाचे आहे. पण एक जपानी व्यक्ती मराठी बोलते हे ऐकून मराठी नेटकर्यांना खूप आनंद झालेला दिसत आहे.
सध्या मराठीवरून जोरदार वाद सुरू असला तरी हा व्हिडीओ पाहून स्पष्ट होते की, जर एखाद्याने ठरवले तर तो काही दिवसांत अगदी सहज मराठी भाषा शिकू आणि बोलू शकतो. मराठीमध्ये बोलायचे म्हणजे अगदीच अलंकारिक बोलले पाहिजे असे काही नाही. तोडके मोडके मराठी बोलले तरी मराठी माणूस तुमच्यावर खूश होतो. एक मिनिट मराठी बोलून या जपानी तरुणांनी मराठी नेटकर्यांना भारावून टाकलेले आहे हे निश्चित.