

नागपूर ते मुंबई किंवा मुंबई ते नागपूर हा प्रवास सुखावह झाला आहे. नवीनच तयार करण्यात आलेला समृद्धी महामार्ग अद्भुुत आणि अफलातून आहे. सुमारे 120 किलोमीटर प्रति तास या वेगाने विनाअडथळा तुम्ही शेकडो किलोमीटर गाडी चालवू शकता. त्यासाठी प्रति किलोमीटर अंदाजे दोन रुपये आकार लावला जातो. पण चालकांच्या बेभान वाहन चालवण्याच्या वागण्यांमुळे या महामार्गावर अनेक अपघात झाले आहेत हेसुद्धा याठिकाणी लक्षात ठेवावे लागेल. चालकांनी आपल्या वाहन चालवण्याच्या सवयीला लगाम घालावाच लागेल हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही. महाराष्ट्रातील बरेचसे रस्ते चांगले झाल्यामुळे आपल्या मराठीमधील यातायात फारशी करावी लागत नाही.
नेहमीच प्रवास करणार्या लोकांना मात्र समृद्धीसारख्या महामार्गावर प्रवास करताना फार चुकल्या चुकल्यासारखे वाटत असते. महत्त्वाचे म्हणजे या महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी मजबूत कंपाऊंड वॉल असल्यामुळे कुठूनही दुचाकी वाहने किंवा व्यक्ती अथवा जनावरे या मार्गावर प्रवेश करू शकत नाहीत. इतरत्र तुम्ही कुठेही प्रवास करत असाल तर अचानक रस्त्यामध्ये काय येऊन तुमच्या पुढे उभे ठाकेल काही सांगता येत नाही. प्रवासात सर्वात मोठा अडथळा मोकाट फिरणार्या जनावरांचा असतो. चारा आणि खाद्याच्या शोधामध्ये ही जनावरे दिवस-रात्र भटकत असतात. ती रस्त्यावर येऊन बरेचदा ते ठिय्या आंदोलन करतात. त्यामुळे रस्त्यावरची वाहतूक ठप्प होते. रस्त्यात कुठलाही अडथळा न येता शेकडो किलोमीटर गाडी चालवत तुम्ही जात असाल तर साधारण मराठी माणसांना हा प्रवास नीरस, बेचव आणि कंटाळवाणा वाटू शकतो. याचे कारण म्हणजे यात कुठलाही त्रास नाही आणि थरारपण नाही.
इतर मार्गावर साधारणत: दर 35 किलोमीटरला तुम्हाला टोल भरावा लागतो. टोल नाक्यावर वाहनांच्या मोठ्या मोठ्या रांगा असतात. यात प्रवाशांचा वेळ जातो आणि त्यांना बरेचदा मन:स्तापालाही सामोरे जावे लागते. समृद्धी महामार्गावर असा कुठला त्रास नाही. प्रवेश करताना तुमच्याकडून एकही रुपया टोल घेतला जात नाही. तुम्ही प्रवेश करता तेव्हा तुमच्या प्रवेशाची एंट्री होते, वाहनाचा नंबर टिपला जातो. समृद्धी महामार्ग सोडून तुम्ही बाहेर पडता तेव्हा तुमचा एकूण प्रवास किती झाला आहे याची समीकरणे जुळवून तुम्हाला टोल आकारला जातो. एक मात्र आहे की, संपूर्ण रस्त्यात एकही गाव लागत नसल्यामुळे नेहमीची सवय असणार्या वाहनचालकांना इकडे तिकडे पाहण्याचे काही कारण उरत नाही. जवळपास कुठेही ब—ेक लावण्याचे काम पडत नाही. गिअर बदलण्याचे काम नाही. यामुळे इंधनाची बचत होते. 120 किलोमीटरचा वेग असेल तर चालकाचा डोळा लागण्याची मात्र शक्यता आहे. याला रोड हिप्नॉटिझम असे म्हणतात. समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला केल्यानंतर सुरुवातीला या महामार्गावर काही मोठे अपघात घडले याचे कारण म्हणजे इतक्या वेगाने आणि इतक्या मोकळेपणाने वाहन चालवण्याची सवयच ड्रायव्हर मंडळींना नव्हती.