Ladka Bhau Yojana
लाडक्या भावांसाठी राज्य सरकारची योजना. Pudhari News Network
संपादकीय

लाडक्या भावाला नामी संधी

पुढारी वृत्तसेवा

दाजींनो लवकर जागे व्हा! ही संधी सोडू नका. अशी संधी वारंवार येत नसते. यासाठी लवकर सावध व्हा. सावध व्हा आणि शिक्षण अर्धवट सुटले असेल, तर ते आधी पूर्ण करा. बरेचदा होते काय की, कशीबशी दहावी पास झालेले विद्यार्थी अकरावी-बारावी प्रवेश घेतात. अर्थातच, कसेबसे शिक्षण पूर्ण करतात; परंतु बारावीला नेमके दोन किंवा तीन विषय राहिलेले असतात. एक-दोन वेळेला प्रयत्न करून ते विषय निघाले नाहीत, तर तो युवक हा नाद सोडून देतो आणि पुढे काहीतरी व्यवसाय करायला लागतो. अशा सर्व युवकांना, भावांना तळमळीची विनंती आहे की, थोडा अभ्यास करून ते विषय एकदाचे काढा म्हणजे तुम्ही बारावी पास व्हाल!

माझा लाडका भाऊ हा आता कुणा एका बहिणीचा लाडका राहिलेला नसून मुख्यमंत्री महोदयांचाही लाडका भाऊ झालेला आहे. लाडक्या भावासाठी मोठ्या भावाने एक योजना आणली आहे. समजा तुमची बारावी पूर्ण झालेली आहे आणि त्यानंतर तुम्हाला रोजगार मिळत नाही, तर तुम्हाला सुमारे सहा हजार रुपये महिन्याला अप्रेंटिस भत्ता मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शक्यता निर्माण काय म्हणायचे? तशी योजना आली असून त्याची कार्यवाहीपण सुरू झाली आहे. सहा हजार म्हणजे काय कमी रक्कम नाही, हे आधी समजून घ्या. त्यासाठी सर्वात प्रथम तुम्ही बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासाठी तत्काळ कामाला लागा. ज्यांनी गेल्या दोन-चार वर्षांत बारावीचे शिक्षण अर्धवट सोडले आहे, आम्हाला खात्री आहे की, हे सर्व लोक या संधीचा फायदा घेतील. हातातील सगळी कामे सोडून बारावीचे जे काय एक, दोन, तीन, चार विषय राहिलेले आहेत त्याचा अभ्यास करून उत्तीर्ण होतील.

अशीच परिस्थिती डिप्लोमा म्हणजे पदविकाधारकांची आहे. डिप्लोमाच्या पहिल्या वर्षातच गटांगळ्या खाणारे अनेक युवक त्याचा नाद सोडून देतात आणि दुसरा काहीतरी उद्योग करायला सुरुवात करतात. बंधूंनो, लक्षात घ्या की तुम्ही डिप्लोमा पूर्ण केला असेल, तर तुम्हाला दर महिन्याला आठ हजार रुपये मिळणार आहेत. आठ हजार म्हणजे काय कमी रक्कम नसते. एकट्या युवकाच्या गरजा या आठ हजारांत सहज पूर्ण होऊ शकतात. ही योजना आल्यामुळे अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे. ज्यांचे शिक्षण अर्धवट सुटलेले आहे ते शिक्षण पूर्ण करण्याच्या मागे लागतील आणि ते पूर्ण करून ते या योजनेमधील प्रतिमाह दहा हजार रुपयांच्या भत्त्याला पात्र ठरतील, असे दिसते आहे. विवाह जुळून येत नाहीत तेपण जुळण्याची शक्यता आहे. उमेदवार वराला दहा हजार रुपये मिळतील. मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीपण समोर येण्याची शक्यता आहे. नवर्‍याचा दहा हजार रुपये भत्ता, त्याच्या बायकोला लाडकी बहीण योजनेंतर्गत मिळणारे दरमहा दीड हजार रुपये शिवाय वर्षाला चार सिलिंडर, वयोवृद्ध आई-वडील घरात असतील, तर त्यांना मिळणारी पेन्शन, आई किंवा वडील वृद्ध कलावंत असतील, तर त्यांना मिळणारी पेन्शन अशा सर्वांचा सहभाग होऊन हातभार लागून एखादा संसार मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बहिणीला कुठे प्रवास करायचा असेल, तर 50 टक्के सवलत आहेच की, जी आता जवळपास मोफत झाल्यात जमा आहे. रेशनवर स्वस्तात मिळणारे धान्य, पैसे खर्च न करता मिळणारे सिलिंडर आणि अन्य भत्ते पाहता संसार सुखाचा करण्यासाठी जे नियोजन केले आहे, ते थक्क करणारे आहे.

SCROLL FOR NEXT