Ladka Bhau Yojana
लाडक्या बहीणीनंतर आता लाडका भाऊ योजना Pudhari File Photo
संपादकीय

लाडक्या भावालाही पाठबळ

पुढारी वृत्तसेवा

आता महाराष्ट्र राज्यामध्ये कुणी म्हणून काळजी करण्याची गरज राहिलेली नाही. तुम्हाला नोकरी असो, नसो, तुम्ही बारावी पास असो की तुमची डिग्री झालेली असो की तुमचा डिप्लोमा झालेला असो, तुम्हाला आता काळजी करण्याची अजिबात गरज राहिलेली नाही. लाडक्या बहिणीच्या भावांनो अजिबात घाबरू नका. आता तुमच्या पाठीशी स्वतः एकनाथ उभे राहिलेले आहेत.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची झुंबड संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे. लाडक्या भावाकडून म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकारकडून बहिणीला नियमित प्रतिमाह 1,500 रुपये मिळणार आहेत. भावाची ही ओवाळणी मिळवण्यासाठी जी काय प्रोसिजर करावी लागते त्यासाठी लाडक्या बहिणी आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब प्रचंड धावपळ करत आहे. हा अर्ज दाखल करण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. ही संधी हातातून निसटू नये म्हणून बहिणींचा जीवापाड संघर्ष सुरू आहे. बहिणीची चांदी झालेली पाहून त्यांच्या भावांना मात्र नैराश्य आलेले होते. या भावांची मरगळ झटकण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केले असून लाडका भाऊ योजना आणली आहे. सध्या शासन जनतेला इतके काही देत आहे की, ही संधी हुकली तर आपलीच झोळी फाटकी आहे, असेही लोकांना वाटण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य योजना, लाडक्या बहिणींसाठी नियमित पतपुरवठा योजना, बहुतांश जणांना मोफत रेल्वे, बस प्रवासाचे पास, असंख्य महिलांना काही गॅस सिलिंडर दरवर्षी मोफत, शाळकरी मुलींना शाळेला जाण्यासाठी एसटी मोफत आणि आता बेरोजगार भाऊ मंडळींना दर महिना अप्रेंटिस भत्ता सुरू करण्यात आलेला आहे. शिवाय शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये दरवर्षाला काही हजार रुपये केंद्र सरकारकडून आणि काही हजार रुपये राज्य सरकारकडून लॉटरी लागावी तसे अचानक येऊन पडतात.

भाऊ मंडळींसाठी आणलेली योजना मात्र ग्रामीण भागात बर्‍यापैकी खळबळ माजवणारी असणार आहे. शेती करणार्‍या युवकांचा सध्या लग्नाचा मोठाच प्रॉब्लेम होऊन बसलेला आहे. ग्रामीण भागात संसार करण्यासाठी महाराष्ट्रातील तरुणी फारशा उत्सुक नाहीत. याचा परिणाम म्हणजे लहानसहान गावातही विवाहासाठी ताटकळलेले किमान पंधरा-वीस तरुण दिसून येतात. अशा तरुणांना विवाहाचे आमिष दाखवून लुबाडणार्‍या एजंट लोकांची पण काही कमी नाही. काही लाख रुपये घेऊन हे एजंट लोक युवकांना विवाहासाठी उपवर वधू उपलब्ध करून देतात. लग्नानंतर जेमतेम दोन ते तीन दिवसांत ही वधू अंगावरील दागिन्यांसह आणि सासूरवाडीतील गल्ल्यावर डल्ला मारून फरार होते, ती नंतर कुणालाच सापडत नाही. लग्न झाले; पण बायको मिळाली नाही आणि बायको आली; पण ती टिकली नाही. शिवाय एजंटच्या घशात गेलेले पैसे परत येण्याची सुतराम शक्यता नाही. असे फसवले गेलेले असंख्य करून आज ग्रामीण भागामध्ये आहेत. लाडका भाऊ योजनेत 12 वीनंतर सहा हजार, डिप्लोमानंतर आठ हजार आणि पदवीधारकांसाठी दहा हजार रुपये प्रशिक्षण भत्ता शासनाकडून दिला जाणार आहे. कदाचित यामुळे काही बेरोजगार युवकांचे विवाह जुळून येतील अशी शक्यता निर्माण झाली आहे. आता तुम्ही म्हणाल याचा शिक्षण क्षेत्राशी काय संबंध? लक्षात घ्या, एखाद्या युवकाचे 12 वीचे एक-दोन विषय राहिले, असतील तर जीवाच्या आकांताने अभ्यास करून तो ते विषय काढून बारावी पास होईल आणि लाडका भाऊ योजनेसाठी पात्र होईल.

SCROLL FOR NEXT