Anant-Radhika Wedding : भव्य-दिव्य सोहळा

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाह सोहळा
Anant Ambani and Radhika Merchant's wedding ceremony
पुढारी तडका आर्टीकलPudhari File photo

मंडळी, गेले पंधरा दिवस झाले आपण अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाह सोहळ्याच्या बातम्या डोळे भरून पाहत आहोत. अनंत अंबानी हे आशिया खंडातील नव्हे, तर जगातील एक प्रमुख श्रीमंत गृहस्थ असलेले मुकेश अंबानी यांचे चिरंजीव आहेत. आता लग्न झाले आहे; परंतु त्यापूर्वी प्री-वेडिंगही इतकेच भव्य-दिव्य झालेले होते. जगातील कित्येक राष्ट्रांचे प्रमुख विमाने घेऊन थेट या विवाह सोहळ्याला आलेले होते. भारतातील सर्वच राजकीय पक्षांचे मोठे नेते, चित्रपट, कला, क्रीडा, संगीत या क्षेत्रांमधील सगळे सेलिब्रिटीज आणि चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदीही या सोहळ्याला हजर होते. मुकेश अंबानी यांच्या एकूण भव्य-दिव्य संपत्तीचा सोहळा आपल्या देशाने डोळे भरून पाहिला. या सोहळ्याची चर्चा संपूर्ण जगात झाली असे मीडियातील बातम्यांमधून लक्षात आले आहे. अगदी शेजारी असलेला दुश्मन देश म्हणजे पाकिस्तानातूनही या विवाह सोहळ्यावर खूप प्रतिक्रिया आल्या आहेत. अंबानींचा एकूण टर्नओव्हर आणि संपत्ती ही पाकिस्तानच्या अर्थसंकल्पापेक्षा मोठी आहे असे लक्षात आल्यानंतर त्या देशातील जनतेच्या मनामध्ये निराशा निर्माण झाल्याची वार्ता आली.

आपण सर्वसामान्य लोकांनीही हा भव्य-दिव्य सोहळा घरी बसून टीव्हीवर साजरा केला. जेमतेम उत्पन्न असणारे आपल्यासारखे लोक महिना अखेरीला गोडेतेल संपले, तर काय करायचे हे विसरून जाऊन भान हरपून हा सोहळा पाहत राहिलो. अनंत अंबानी यांचे घड्याळ 54 कोटी रुपयांचे होते म्हणे! विवाहास हजेरी लावलेल्या प्रत्येकाला किमान दोन कोटी रुपयांचे घड्याळ रिटर्न गिफ्ट म्हणून मिळाले होते. कित्येक लोकांसाठी चार्टर म्हणजे स्वतंत्र विमाने बुक करून दिलेली होती. धनिक घरची बाळे या लग्नामध्ये नाचणे कर्तव्य समजून बेधुंद नृत्य करत होती. राजकीय पक्षांशी संबंधित काही धनिक मुले नाचत असलेले व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाले होते. ज्या पाश्चात्त्य कलाकारांना आपण केवळ टीव्हीवर पाहतो किंवा त्यांच्याबद्दल ऐकतो ते लोक अंबानींच्या घरच्या कार्यात घरचे लोक असल्यासारखे नाचत होते. आपणही नाही का आपल्या मगदुराप्रमाणे मुलाबाळांच्या लग्नात खर्च करीत असतो, तसेच त्यांचेही होते हे भारतातील सामान्य जनतेने मान्य केले आहे. त्याचे पैसे तो खर्च करेल तर त्यात वावगे असे काय आहे? नेमके याच वेळी जिओ रिचार्जचे दर वाढले. त्यामुळे देशातील प्रत्येक जिओच्या ग्राहकाला अंबानींना आहेर केल्याचे सुख मिळाले. खरं तर, जिओ किंवा तत्सम व्यापार हे अंबानींसाठी त्यांच्या साम—ाज्याचा एक किंचितसा भाग आहेत. आशिया खंडातील किंवा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये ज्या व्यक्तीचे नाव येते त्याचा काही एकच कारभार नसतो. त्यांचे अनेक व्यवसाय असतात. त्यापैकी एक जिओ मोबाईल नेटवर्क आहे.आजकाल आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नात येवला येथे जाऊन पैठणी खरेदी करणे हे सामान्य मध्यमवर्गीयांसाठी नेहमीचे झाले आहे. अंबानी यांच्या वधूसाठी येवला येथील पैठणी खरेदी करण्यात आली होती. ही पैठणी तयार करण्यासाठी सुमारे 50 कारागीर सहा महिने झटत होते. अंबानीच्या सूनबाईची पैठणी ज्या गावची आहे त्याच गावातून आपणही आपल्या सूनबाईसाठी पैठणी आणली होती, हे लक्षात आल्यामुळे आपल्या राज्यातील अनेक लोक हरखून गेले आहेत. अंबानींच्या विवाह सोहळ्यात आणि आपल्या सर्वसामान्य विवाह सोहळ्यामध्ये हाच एक तो काय कॉमन धागा होता बहुतेक!

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news