इतिहासाचा धडा! (Pudhari File Photo)
संपादकीय

History Lesson | इतिहासाचा धडा!

इतिहास माणसाला शहाणा करतो, असे जगद्विख्यात इतिहासकार बेकन समजत होता.

पुढारी वृत्तसेवा

इतिहास माणसाला शहाणा करतो, असे जगद्विख्यात इतिहासकार बेकन समजत होता. पण आज जगातील अनेक आपत्ती आणि अनर्थ इतिहासापासून निर्माण होताना दिसत आहेत, असे स्पष्ट प्रतिपादन थोर इतिहासकार त्र्यंबक शंकर शेजवलकर यांनी केले होते. हिटलरच्या उदयाचे एक कारण मुळातच खुडले गेले असते, असेही त्यांनी म्हटले होते. तर इतिहास म्हणजे केवळ घटनांची नोंद नाही, तर त्यामागील कार्यकारणभाव आणि मानवी स्वभाव यांचा अभ्यास आहे, असे मत नामवंत इतिहासकार जदुनाथ सरकार यांनी व्यक्त केले होते. अनेक वर्षे ब्रिटिशांनी सांगितलेला इतिहासच आपण कथन करत राहिलो. या इतिहासात परकीयांच्या द़ृष्टिकोनातून एक विकृत इतिहास मांडला. आता इतिहास या विषयामुळे सतत चर्चेत येणार्‍या एनसीईआरटी बोर्डाने, म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण मंडळाने आठवीच्या इतिहासाच्या पुस्तकात मोठे बदल केले आहेत. नवीन पुस्तकांमध्ये मुघल बादशहा बाबरचे ‘अत्यंत क्रूर आणि निर्दयी’ अशा शब्दांत वर्णन केले आहे. बाबरने अनेक शहरांमध्ये लोकांची क्रूरपणे हत्या केली, असेही त्यात म्हटले आहे; तर अकबराचे शासन हे क्रौर्य आणि सहिष्णुता यांचा ताळमेळ असलेले होते. औरंगजेबाने मंदिरे आणि गुरुद्वारे तोडले, असेही त्यात नमूद केले आहे.

‘इतिहासातील काळे अध्याय’ असा उल्लेख करत, मुघलांचा इतिहास एनसीईआरटीच्या या आठवीच्या पुस्तकात लिहिला आहे. ‘समाजशास्त्र’ विषयाच्या आठवीच्या नव्या पुस्तकात मुघल तसेच मराठ्यांच्या इतिहासावरील धड्यांचा समावेश केला आहे. शालेय वयातील मुलांना इतिहास शिकवताना, तो समतोल पद्धतीने आणि विविधांगांनी शिकवला जावा, अशी अपेक्षा असते. कोणत्याही राष्ट्राच्या इतिहासात काही चांगल्या आणि काही वाईट गोष्टी असतात. पण वाईट गोष्टींचा उल्लेखच केला नाही, तर चांगल्या बाबींचे महत्त्व अधोरेखितही होऊ शकत नाही. ‘रिशेपिंग इंडिया पोलिटिकल मॅप’ नावाचा भाग या पुस्तकात असून, त्यात तेराव्या ते सतराव्या शतकापर्यंत काय घडले, या घटनांची माहिती दिली आहे. दिल्ली साम्राज्य, विजयनगर साम्राज्य, मुघल शासन, शिखांचा उदय अशा सर्व विषयांची माहिती या पुस्तकात दिली आहे. त्या काळातील खेडेगावांची व शहरांची रचना कशी होती, हेही वाचायला मिळते. इतिहास म्हणजे केवळ युद्ध, संघर्ष आणि रक्तपात नव्हे. त्यावेळचे स्थापत्यशास्त्र, नगररचना, व्यवसाय-उद्योग यांची माहिती मिळाल्यास राष्ट्राची प्रगती कसकशी होत गेली, हेही समजू शकते. मात्र त्याचवेळी मुघलांनी हिंदूंवर आणि त्यांच्या मंदिरांवर हल्ले केले, हे नाकारण्याचे कारण नाही.

डाव्या इतिहासकारांच्या काही पूर्वग्रहांमुळे मुघलांच्या काळ्या इतिहासावर त्यामानाने भर दिला जात नव्हता. आता एनसीईआरटीच्या पुस्तकात मात्र अल्लाउद्दीन खिलजीचा सेनापती मलिक काफूरने श्रीरंगम, मदुराई, चिदंबरम, रामेश्वरम यांसारख्या मंदिरांवर हल्ले केले. मुघल काळात बौद्ध, जैन आणि हिंदू धर्मातील मंदिरांमध्ये असलेल्या मूर्ती फोडल्या आणि लुटल्या. बिगर मुस्लिमांवर जिझिया कर लावला. तसेच त्यांचा अपमान केला गेला. तुम्ही धर्म बदला आणि इस्लाम स्वीकारा, असेही त्यांना सांगितले गेले होते. तर बाबर अत्यंत क्रूर शासक होता, त्याने शहरांवर हल्ले करून लोकांची हत्या केली. महिला व लहान मुलांना कैदेत टाकले, अशी माहितीही पुस्तकात दिली आहे. औरंगजेबाने मथुरा, सोमनाथ येथील मंदिरे आणि जैन मंदिरे तोडली, तसेच त्याने शिखांच्या गुरुद्वारांवरही हल्ले केले, याचे संदर्भ पुस्तकात आहेत. मात्र पुस्तकांमध्ये या प्रकारचे बदल झाल्यानंतर वाद निर्माण होऊ शकतो. हे टाळण्यासाठी भूतकाळातील घटनांसाठी आज कोणालाही दोषी ठरवू नये, असेही एनसीईआरटीने म्हटले आहे. हिंदू आणि मुस्लिम यांच्यात दुही निर्माण करण्याचे काम ब्रिटिशांनी केले. जुना इतिहास उकरून कोणत्याही समाजघटकाला त्रास दिला जाऊ नये, ही त्यामागील रास्त भावना आहे. एनसीईआरटीने गेल्यावर्षीही पुस्तकांत काही बदल केले.

अभ्यासक्रमात राष्ट्रीय युद्ध स्मारक हा विषय अंतर्भूत केला. यासोबतच शालेय पुस्तकांमध्ये वीर अब्दुल हमीद यांच्यावरील एक प्रकरण सामविष्ट केले. 1857 चा स्वातंत्र्यसंग्राम, महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखालील चळवळ, तसेच 1947 नंतरच्या पाकिस्तानसोबतच्या युद्धात अनेक मुस्लिमांनी भारतमातेसाठी केलेले प्राणार्पण, हेही लक्षात ठेवले पाहिजे. मात्र त्याचवेळी मुघलांच्या इतिहासाची आणखी एक बाजू आहे. सेतुमाधवराव पगडी यांच्यासारख्या इतिहासकारांनी लिहून ठेवले आहे की, मध्ययुगात मुसलमानांनी भारतीय संगीताचा अभ्यास केला आणि त्यावर फार्सीत ग्रंथ लिहिले. अकबराने तर भाषांतराचे एक स्वतंत्र खातेच उघडले, अबुल्फजल, फैझी, अब्दुल्कादर बदायुनी आदी मंडळींकडून त्याने महाभारत, रामायण, हरिवंश, भागवत योगवासिष्ठ, राजतरंगिणी, पंचतंत्र, सिंहासनबत्तीशी आदी संस्कृत ग्रंथांची फार्सी भाषांतरे करवून घेतली. त्याचा राजकवी फैझी याने तर ‘नल-दमयंती आख्याना’वर फार्सीतून महाकाव्य रचले. या काव्यातून त्याचा भारतीय संस्कृतीबद्दलचा अभिमान व्यक्त झाल्याचे आढळून येते. आणखी एक गोष्ट म्हणजे, जहांगीरच्या काळात मुल्ला मसीहाने रामायणावर फार्सीतून महाकाव्य रचले. तर शहाजहाँचा मुलगा दारा शुकोह हा तर भारतीय संस्कृतीचा मोठा चाहता होता. त्याने अनेक पंडितांना आश्रय दिला. उपनिषदांचे अनुवाद करवले. दाराने स्वतः भगवद्गीतेचा फार्सी अनुवाद केला. इस्लाम आणि हिंदू धर्म यांच्यात समान तत्त्वे कशी आहेत, हे दाखवण्यासाठी त्याने ‘मज्मुअल बहरैन’ म्हणजे ‘समुद्रसंगम’ हा फार्सी ग्रंथ लिहिला. दारा शुकोहची काही संस्कृत पत्रे उपलब्ध आहेत.

थोडक्यात, इतिहासाच्या सर्व बाजू विद्यार्थ्यांना कळाल्या पाहिजेत. वैभवशाली इतिहास, त्यातील कटू आठवणींसह लोकांसमोर ठेवलाच पाहिजे. या बर्‍या-वाईट इतिहासापासूनच नव्या पिढ्या शिकत राहतील. त्यातही इतिहासातील सत्य समोर आले पाहिजे. ज्ञानसापेक्षी जगाची मांडणी करताना इतिहासाची चिकित्सा करण्याची आणि इतिहास उलगडून सांगण्याची जबाबदारी सर्वांची आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT