गुरुपौर्णिमा सर्वत्र जोमदारपणे सर्वत्र साजरी झाली. गुरू-शिष्य परंपरा हे भारतीय संस्कृतीचे आगळे-वेगळे वैशिष्ट्य आहे आणि अशा प्रकारचे नातेसंबंध जगात अन्यत्र कुठेही नसतात. आपल्या शिष्याला नेहमी उन्नत करण्याच्या उद्देशाने गुरू त्याच्यावर संस्कार करत असतात आणि त्याचबरोबर शिष्यही समर्पित भावनेने गुरूंच्या आज्ञा ऐकत असतात. आजकालच्या काळात चांगले गुरू मिळणेसुद्धा दुरापास्त झाले आहे. या ठिकाणी गुरू आणि शिक्षक यांच्यामधील फरक समजावून घेतला पाहिजे.
शिक्षक हे विद्यार्थ्याला ज्ञानदान करण्याचे कार्य करत असतात. औपचारिक शिक्षण देऊन त्याला स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी शिक्षक सतत कार्य करत असतात. त्यांच्या प्रति आपण नेहमीच कृतज्ञ पाहिजे. जीवनाच्या संघर्षात किंवा भवसागरात शिष्य योग्य मार्गावर चालावा यासाठी गुरू प्रयत्न करत असतात. योग्य वाट दाखवतो तो खरा गुरू असे म्हटले जाते. आजच्या काळात काही गुरूंचे स्वतःचे आचरण असे असते की, ते शिष्यांना या वाटेने जाऊ नकोस, असे सांगत असावेत. बहुतांश विद्यार्थी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या वंदनीय शिक्षकांची आठवण काढून त्यांना वंदन करत असतात. सगळेच शिक्षक काही गुरुपदाला पोहोचलेले नसतात. ते बिचारे आपले नोकरी करून जमेल तसे ज्ञानदान करत असतात. ग्रामीण भागात पाहिले तर शिक्षक नावाचा गुरू विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण देत असतो. असे सर्व गुरू नसतात.
उदाहरणार्थ काही शिक्षक शालेय कामकाजाकडे दुर्लक्ष करून थेट राजकारणाच्या आखाड्यामध्ये उतरलेले दिसून येतात. गाव छोटे असेल तर ते थेट ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये रस घेत पंच आणि सरपंच यांनाही मार्गदर्शन करत असतात. ग्रामीण भागात शिक्षकांना विशेष मान असतो. कारण छोट्याशा गावामध्ये ते सर्वात अधिक शिकलेले असतात.
अशा या प्रशिक्षणाचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना होत असतो. एखादा खोडकर विद्यार्थी पुढे राजकारणात आला आणि जिल्हा परिषद अध्यक्ष वगैरे झाला तर शिक्षकांना आपली बदली पाहिजे त्या करून घेण्यासाठी त्यांचा उपयोग होत असतो. आपल्या शाळेत शिकलेले काही विद्यार्थी आयएएस किंवा आयपीएस झाले तर गुरूंना त्यांचा अभिमान असतो. शिक्षकाचे काम हे पाणपोईसारखे असते. कोणीही वाटसरू पाणी प्यायला आला तर त्याला पाणी देण्याचे काम पाणपोईवर होत असते. तसेच एकाच वेळी असंख्य विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक आपापल्या पद्धतीने त्यांच्यावर संस्कार घडवत असतात आणि शिक्षण देत असतात. काही विद्यार्थी घडतात. काही बिघडतात. त्याला शिक्षकांचा म्हणजे त्यांच्या गुरूंचा अर्थातच नाईलाज असतो. आज सर्वत्र पाहिले तर घडवणारे शिक्षक आहेत आणि बिघडविणारे पण शिक्षक आहेत. आपले शिक्षक आपले गुरू आहेत ही भावना संस्कृतीमध्ये कायम आहे. ही भावना कायम आहे, तोपर्यंत शिक्षकांच्या प्रति गुरुभाव वाढत राहील यात शंका नाही.