तडका : कौशल्य वाढवायलाच हवे!
मंडळी कृत्रिम बुद्धिमत्ता ज्याला सोप्या मराठीत आजकाल ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’ म्हटले जाते ती काय भानगड आहे, हे अजून बर्याच लोकांच्या लक्षात आलेले नाही. व्यक्तीची बुद्धिमत्ता आपल्याला माहीत होती; परंतु यंत्राची बुद्धिमत्ता असू शकते, याविषयी आपल्याला काही अंदाज नव्हता. आपल्यासारख्या सामान्य लोकांना दैनंदिन जीवनात याची गरजही पडत नाही. सध्या चर्चा अशी चालू आहे की, या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे माणसांच्या अडचणी वाढतील काय, याचे निश्चित उत्तर आम्हासही माहीत नाही; परंतु माणसाने आपल्या कामाचे कौशल्य वाढवायला हवे, हे नक्की!
समजा, तुमचा एखादा सहकारी वयाच्या 58 व्या वर्षी सरकारी नोकरीतून निवृत्त होणार आहे. कार्यालयातील तुम्ही त्याचे अत्यंत जवळचे मित्र असल्यामुळे निवृत्ती समारंभात तुम्ही बोललेच पाहिजे, असा तुम्हाला आग्रह आहे. तुम्ही फारसे कधी भाषण केलेले नाही, की कसे करतात हेही तुम्हाला माहीत नाही. अशावेळी ही कृत्रिम बुद्धिमत्ता तुम्हाला मदतीला सहज येते. त्यावर तुम्ही बोलूनही आदेश देऊ शकता. तुम्हाला आधी तुमच्या सहकार्याबद्दलचे भाषण लिहून पाहिजे. काल्पनिक उदाहरण घेऊया! तुमच्या मित्राचे नाव मोहन आहे. तुम्ही थेट एआयच्या तोंडी आदेश द्या, ‘मोहनच्या सेवानिवृत्ती समारंभामध्ये बोलण्यासाठी भाषण 200 शब्दांत लिहून द्या!’ हा आदेश तुम्ही मराठीतही देऊ शकता. तुम्ही आदेश दिल्याबरोबर अवघ्या काही सेकंदांत मोहनच्या सेवानिवृत्ती समारंभात तुम्ही कोणते भाषण करणार आहात, ते थेट लिहूनच तुमच्यापुढे येते. हे भाषण तुम्ही वाचून दाखवले की, तुमचा विषय संपला. अशी ही भन्नाट एआयची संकल्पना आहे.
बरेचदा बर्याच गोष्टी आपल्याला कळत नसतात. उदाहरणार्थ. तुम्ही तुमची प्रकृती दाखवायला गेलात आणि डॉक्टरनी तुम्हाला काही टेस्ट करायला सांगितल्या. त्याचा जो रिपोर्ट येतो, तो तुम्हाला कळत नाही. तुम्ही तो आलेला रिपोर्ट जशाचा तसा एआयला द्या आणि या रिपोर्टचे स्पष्टीकरण द्या, असा आदेश द्या. अवघ्या काही सेकंदांत त्या रिपोर्टमध्ये तुमच्यासाठी काय नॉर्मल होते आणि काय चांगले नाही, हे एआय स्पष्ट करून तुम्हाला सांगून थक्क करून टाकेल. तुम्हाला एखाद्या विषयावर कविता करायची असो, निबंध लिहायचा असो, लेख लिहायचा असो, एखाद्या शब्द कवितेला संगीत द्यायचे असो आणि ते कोणत्याही भाषेत असो तुमचे काम काही क्षणात करून देणारी ही कृत्रिम बुद्धिमत्ता माणसाच्या बुद्धिमत्तेला मात देईल की काय, अशी कधीकधी शंका वाटते. अर्थात, मानवी बुद्धिमत्तेला आव्हान होईल, असे काही जगात नसते. एखाद्याला एखादे काम सांगितले, तर ते त्याने एआयवर पूर्ण केले आहे, हे तुम्हाला तत्काळ ओळखू येते. कारण, त्यात मानवी भावभावना नसतात. बुद्धिमान लोकांनी एआय सारख्या अत्याधुनिक तंत्रावर हुकूमत मिळवून स्वतःचे काम अधिक अव्वल दर्जाचे केले पाहिजे, तरच मानवी बुद्धिमत्तेचा मान जगात टिकून राहील.

