

फार पूर्वी आमदार किंवा खासदारकीच्या निवडणुका आल्या की, संबंधित उमेदवारांना निधी उपलब्ध करून देण्यामध्ये व्यापारी मंडळींचा मोठा हात असे. किंबहुना व्यापारी मंडळींच्या शिवाय कुठलीही निवडणूक होत नसे. यामध्ये विशेषतः कंत्राटदार लोक जे लाखोंनी कमवतात, ते आमदारांच्या पाठीशी असत. काळ बदलला तसे कंत्राटदारांना स्वतःला आमदार व्हावेसे वाटू लागले. मी कुणाला आमदार करत असेल, तर मी स्वतःच आमदार का नको, असा प्रश्न त्यांच्या मनात आला आणि मग जागोजागी कंत्राटदार आमदारकीला, खासदारकीला उभे राहिलेले महाराष्ट्रात दिसून आले.
अशीच काहीशी स्थिती अमेरिकेमध्ये झालेली आहे. ट्रम्प महोदय ज्या वेळेला राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला उभे होते तेव्हा अमेरिकेतील सर्वात श्रीमंत व्यक्ती टेस्ला कंपनीचे मालक एलॉन मस्क त्यांच्या पाठीशी उभे होते. मस्क आपली स्वतःची कंपनी त्या काळात सोडून देऊन प्रचारासाठीसुद्धा ट्रम्प यांच्याबरोबर होते. निवडणूक ट्रम्प लढवत आहेत की एलॉन मस्क लढवत आहेत, याविषयी शंका निर्माण व्हावी इतका मस्क यांचा या निवडणुकीमध्ये सहभाग होता.
यथावकाश निवडणुका झाल्या आणि ट्रम्प निवडून आले आणि अवघ्या एक महिन्यांमध्ये त्यांचे आणि मस्क यांचे संबंध बिघडले. अत्यंत धनाढ्य व्यक्ती असल्यामुळे आज आपण ट्रम्प यांना निवडून आणले असले, तरी पुढचे राष्ट्राध्यक्ष आपणच का होऊ नये, असा प्रश्न त्यांच्या मनात उभा राहिला. अतिश्रीमंत लोकांना काही अशक्य नसते. अमेरिकेमध्ये द्विपक्षीय लोकशाही आहे. रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट असे दोनच पक्ष आहेत. त्यात ट्रम्प यांना कंटाळल्यामुळे मस्क यांनी स्वतःचाच नवीन पक्ष काढण्याची घोषणा केली आहे. अशा पक्षाला अमेरिकेमध्ये कायदेशीर मान्यता आहे की नाही, याविषयी निश्चित माहिती नाही; परंतु जसा प्रकार आपल्या भागात कंत्राटदारांना आमदार व्हावेसे वाटणे असा झाला तसेच ट्रम्प यांना आपण स्वतः राष्ट्राध्यक्ष व्हावे, अशी इच्छा मनात निर्माण झाली.
आता ट्रम्प महोदयांना शांततेचा नोबेल पुरस्कार हवा आहे म्हणे! यासाठी त्यांनी आपली उमेदवारी अनेकवेळा घोषित केली आहे; पण आपणास हा पुरस्कार मिळेल की नाही, याची खात्री त्यांना नाही. कारण, मी उदारमतवादी नाही, असे पुरस्कार समितीला वाटत आहे; पण पाकिस्तानसारख्या अशांततावादी आणि दहशतवादाला पाठिंबा देणार्या देशाने ट्रम्प यांना नोबेल मिळण्यासाठी शिफारस केली आहे, आहे की नाही गंमत! आता पाकिस्तान पाठोपाठ इस्रायललाही ट्रम्प हे शांततादूत असल्याने त्यांना नोबेल मिळायला हवा आहे, असे वाटत आहे. ‘सर्वत्र मीच’ अशी भावना असणार्या ट्रम्प यांना काय म्हणावे, हेच कळत नाही. सर्व काही ओरबडून घेण्याची त्यांची इच्छा वाढतच आहे, हे कळायला लोक काही दुधखुळे नाहीत; पण त्याची ट्रम्प हे तमा कशासाठी बाळगतील, असो!