मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनंतर आता 'दाजी' साठीही योजना हवी Pudhari File Photo
संपादकीय

तडका : दशमग्रह दाजी

दाजींसाठी स्वतंत्र योजना आणण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

राज्यभरातून स्वागत केली गेलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उत्तम कारभाराचे निदर्शक समजले पाहिजे. ते अत्यंत धडाडीचे आणि कर्तव्यतत्पर नेते आहेत हे त्यांनी सिद्ध केलेले आहे. लाडक्या बहिणीसाठी महाराष्ट्र शासनाने जो उपक्रम हाती घेतला आणि त्यासाठी जी भरीव तरतूद केली आहे ती महत्त्वाची आहेच; परंतु लाडक्या बहिणीचे लग्न झाल्यानंतर दाजी नावाचे एक प्रकरण भावाच्या आयुष्यात येत असते. त्यांचाही विचार व्हावा ही अपेक्षा आहे. मराठीत बहुतांश ठिकाणी बहिणीच्या नवर्‍याला दाजी असे म्हणतात. मराठवाड्यात याला जामात जी की हिंदी दामादची सुधारित आवृत्ती आहे, असे संबोधले जाते. काही सासरे आपल्या जावयांचा उल्लेख जावईबापू असे करतात. जे काय असेल ते असो; परंतु दाजी हे प्रकरण अवघड असते हे नक्की. राज्य शासनाने बहिणीसाठी जशी योजना सादर केली आहे, तशीच काही योजना दाजींसाठी पण आणली पाहिजे, अशी मागणी पुढे आली तर आश्चर्य वाटू देऊ नका.

पूर्वीच्या काळी जावयाला दशम ग्रह असे म्हणत असत. एकूण नऊ ग्रह आहेत आणि ते सर्व महत्त्वाचे आहेत हे आपणा सर्वांना माहिती आहेच. या नवग्रहांचा जो काही भला-बुरा प्रभाव आपल्या आयुष्यावर पडत असेल, त्यामुळे आपले आयुष्य सुखाने किंवा दुःखाने व्यतीत होत असते. जावई नावाचा एक दहावा ग्रह त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. हा ग्रह आपल्या आयुष्याला दोलायमान स्थितीमध्ये ठेवू शकतो. आपल्या कन्येला त्रास देणारा जावई भेटला तर साहजिकच सासुरवाडीतील सर्व लोकांचे जीवन दुष्कर होऊन बसते. त्यामुळे बहीण सुखी राहायची असेल तर आधी दाजीला समाधानी केले पाहिजे हा सासुरवाडीचा विचार असतो. बहीण काय किंवा लेक काय, ती आपलीच असते. परंतु तिचे सुख ज्या माणसावर अवलंबून आहे, असा हा दशमग्रह म्हणजे दाजी होय.

दाजीची निवड करताना बरेच निकष लावून ही निवड केली जाते. कर्तव्यदक्ष असावा, आपल्या मुलीचा सांभाळ चांगला करणारा असावा, निर्व्यसनी असावा, भरपूर प्रॉपर्टी असावी अशा प्रकारचे ते निकष असतात. शक्यतो अशा सर्व निकषांवर खरा उतरणारा आपल्या कन्येसाठी जावई म्हणून नियुक्त केला जातो आणि यथावकाश विवाह संपन्न झाल्यानंतर काही दिवसांतच तो आपले खरे रंग दाखवण्यास सुरुवात करतो. काही दाजींना सासुरवाडीने सतत काही ना काहीतरी द्यावे असे वाटत असते. दुसर्‍या प्रकारचे दाजी मात्र अत्यंत उदार अंतःकरणाचे असतात आणि ते महिनोन् महिने सासुरवाडीला मुक्काम ठोकून असतात. तिसर्‍या प्रकारचे दाजी मात्र बायकोच्या माहेराकडे ढुंकूनही पाहात नाहीत. सबब शासन जर काही बहिणीसाठी करत असेल तर तत्काळ त्यांनी दाजीसाठी काही ना काहीतरी योजना आणली पाहिजे, जेणेकरून दाजीला आपल्यावर अन्याय झाला असे वाटणार नाही. पुरुषसत्ताक पद्धतीप्रमाणे बहिणीला काही मिळाले तर त्यावर दाजीचा अधिकार असतोच. परंतु दाजीला स्वतंत्र काही मिळाले तर त्याचा आनंद काही और असेल. किमान काही द्रवपदार्थ दाजींना आवडत असतील तर त्यावर लाडक्या बहिणीला सुख मिळावे म्हणून किमान दहा टक्के तरी सवलत शासनाने दिली पाहिजे म्हणजे दाजी पण सुखी आणि समाधानी राहू शकतील. आमच्या सूचनेचा विचार शासन गांभीर्याने करेल आणि तत्काळ दाजींसाठी काही ना काही तरी ऑफर घेऊन येईल असा विश्वास वाटतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT