India Canada Row
कॅनडाचा हेतुपुरस्सर खोडसाळपणा  File Photo
संपादकीय

India| कॅनडाचा हेतुपुरस्सर खोडसाळपणा

पुढारी वृत्तसेवा

हेमंत महाजन, ब्रिगेडियर (निवृत्त)

खलिस्तानी दहशतवाद्यांना पाठीशी घालण्याच्या कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टूडो यांच्या भूमिकेमुळे भारत आणि कॅनडातील संबंध चिघळत चालले आहेत. अलीकडेच खलिस्तानी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल कॅनडाच्या संसदेत एक मिनीट मौन पाळून आदरांजली वाहिली. हा खोडसाळपणा असून, यामागे टुडो सरकारचा राजकीय स्वार्थ आहे.

सध्याच्या कॅनडा आणि भारतातील संबंध ताणलेले आहेत. याचे ताजे उदाहरण म्हणजे कॅनडात खासदारांनी खलिस्तानवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल एक मिनीट मौन पाळून आदरांजली वाहिली. भारताने निज्जरला २०२० मध्ये दहशतवादी म्हणून घोषित केले होते आणि त्याची गेल्या वर्षी १८ जून रोजी काही अज्ञात हल्लेखोरांनी व्हॅक्युअरमध्ये गोळ्या झाडून हत्या केली.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी या हत्येत भारतीय एजंटचा सहभाग असल्याचा आरोप केला होता. अर्थातच भारताने हे सर्व निरर्थक आरोप फेटाळून लावले; परंतु तेव्हापासून भारत आणि कॅनडाचे संबंध ताणले गेले आहेत. १८ जून रोजी शीख आंदोलकांनी निज्जरच्या हत्येला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने कॅनडातील भारतीय उच्चायुक्तालयासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हत्येचा प्रतीकात्मक खटला चालवला.

होव स्ट्रीट येथील एके ठिकाणी खोटानाटा खटला भरविला. यात कलाकारांनी सहभाग घेतला होता. या नाटकात एक बनावट न्यायमंडळ आणि पांढऱ्या केसांचा विग घातलेला न्यायाधीशही होता. या न्यायालयाने वकिलाला गेल्या वर्षी सरी येथे झालेल्या हत्येत भारतीय पंतप्रधानांचा सहभाग असल्याचे पुरावे सादर करण्यासाठी बोलावले. या खटल्यांत आरोपीच्या पिंजऱ्यात कैद्याचा पेहराव घातलेल्या पुतळ्याची मिरवणूकही काढली.

भारतासारख्या जगातील सर्वांत मोठी लोकशाही असणाऱ्या देशाच्या पंतप्रधानांचा असा अवमान होऊनही त्याबद्दल कॅनडा सरकारने अवाक्षरही काढले नाही, यावरून कॅनडाचा दुटप्पीपक्षा लक्षात येतो. एवढेच नाही, तर ११ जून रोजी टोरंटोच्या ब्राम्टन भागात ऑपरेशन ब्ल्यू स्टारला ४० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त इंदिरा गांधी यांच्या हत्येचे एक दृश्य साकारले. या वर्षी कॅनडात भारतीय उच्चायुक्तालयासमोर अनेक आंदोलने झाली आणि त्यात भारतीय ध्वजाचाही अवमान करण्यात आला. पंतप्रधान मोदी यांच्या कटआऊटचाही अवमान करण्यात आला. वास्तविक गेल्या वर्षीपासून अशा प्रकारांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

भारतात आणि भारताबाहेर खलिस्तान्यांच्या उपद्रवामुळे निर्माण होणाऱ्या तणावाला मोठी पार्श्वभूमी आहे; मात्र कॅनडात खलिस्तानवाद्यांच्या बेकायदा कृत्यांची तीव्रता अधिक आहे. विशेषतः टूडो यांनी निज्जरच्या हत्येत भारताचा सहभाग असल्याचा आरोप केल्यानंतर कॅनडातील खलिस्तान्यांच्या कुरापतींना आणखीच बळकटी मिळाली आहे.

२०१२ मध्ये भारताचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री कॅनडाच्या ६ दिवसांच्या दौऱ्यावर गेले. तत्कालीन पंतप्रधान स्टिफन हार्पर यांच्यासमोर कॅनडातील भारतविरोधी वक्तव्याचा मुद्दा मांडला. हार्पर यांनी भारताच्या ऐक्याला कॅनडाचा पाठिंबा असल्याचे सांगितले खरे, पण त्यांनी खलिस्तानींच्या समर्थनार्थ सुरू असलेल्या कुरापती थांबविण्यास नकार दिला.

भारतात जी-२० परिषदेच्या निमित्ताने गेल्या वर्षी जस्टिन ट्रुडो भारतात आले होते. त्यावेळीही खलिस्तानवाद्यांबाबत प्रश्न विचारला असता, त्यांनीही हार्पर यांचीच भूमिका मांडली. भारताबाहेर सर्वाधिक शीख बांधव कॅनडात राहतात. तेथे सुमारे ७ लाख ७० हजार शीख असून, हे प्रमाण तेथील एकूण लोकसंख्येच्या २.१ आंतरराष्ट्रीय टक्के आहे.

कॅनडाच्या राजकारणात शिखांची सक्रियता अधिक आहे आणि त्यांनी उद्देश साध्य करण्यासाठी कॅनडाच्या राष्ट्रीय राजकीय व्यासपीठाचा जबरदस्त वापर केला. संधीय नॅशनल डेमोक्रॅटिक पक्षाचा नेता जगमित सिंग हा शीख असून, त्याने ओंटारियोचा खासदार म्हणून राजकीय कारकीर्द सुरू केली. जगमित याने अनेक वर्षांपासून १९८४ च्या शीखविरोधी दंगलीला 'हत्याकांड' म्हणण्याची आग्रही भूमिका मांडली आणि त्याचा निषेध

भारत आणि कॅनडा यांच्यातील 'मुक्त व्यापार करार' थांबला

करणारा ठराव २०१७ मध्ये ओंटारियो येथे मंजूर केला. २०१८ मध्ये संघीय एनडीपीचा अध्यक्ष झाल्यानंतर सिंग याने हा प्रस्ताव देशपातळीवरही मांडला पाहिजे, अशी भूमिका घेतली; मात्र कॅनडा सरकारने अद्याप ते पाऊल टाकलेले नाही. भारतात कुठेही हिंसाचार होत असेल, तर तो खलिस्तानी दहशतवादी करतात. एवढेच नाही, तर अनेक मूळ भारतीय निवासींवर त्यांच्याकडून आक्रमणे होत असतात. या विरोधात कॅनडा सरकार काहीही करायला तयार नाहीये, याला मतपेटीचे राजकारण कारणीभूत आहे.

खलिस्तानवाद्यांच्या प्रभावामुळे भारत आणि कॅनडा यांच्यात होणारा 'मुक्त व्यापार करार' थांबला आहे. तूर्त कॅनडा संसदेकडून हरदीप सिंग निज्जरच्या हत्येला एक वर्ष पूर्ण झाल्याने त्याच्या सन्मानार्थ एक मिनिटाचे मौन बाळगलेले असताना या प्रकाराने नाराज झालेल्या भारतीय दूतावासाने कॅनडाच्या व्हॅक्युअरमध्ये १९८५ च्या एअर इंडिया फ्लाईट १८२ (कनिष्क) बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ कार्यक्रमाचे आयोजन केले.

२३ जून १९८५ रोजी कॅनडाहून लंडनमार्गे भारतात येणारे एअर इंडियाचे विमान आयरिश किनारपट्टीवर स्फोटाने कोसळले. त्यात ८६ मुलांसह ३२९ जण मारले गेले. कॅनडाच्या भूमीवर हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. या घटनेला ३९ वर्षे पूर्ण झाली आणि यानिमित्त ओटावा आणि व्हॅक्युअरमध्ये भारतीय उच्चायुक्तालयाकडून शोकसभा घेण्यात आली. कॅनडातील भारताच्या उच्चायुक्तांनी यावेळी कॅनडाला खडे बोल सुनावले. आजघडीला कॅनडाचे सरकार खलिस्तान्यांच्या विरोधात कारवाई करण्याऐवजी त्यांना राजाश्रय देत आहे.

SCROLL FOR NEXT