‘आमार सोनार बांगला आमि तोमाय भालोबाशी’ हे रवींद्रनाथ ठाकूर यांचे प्रसिद्ध गीतच बांगला देशाचे राष्ट्रगीत बनले; परंतु आज तोच सोन्यासारखा देश जळत असून, त्या देशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांना देशाबाहेर पळून जावे लागले आहे. त्यामुळे देशातील त्यांची 15 वर्षांची राजवट आकस्मिकपणे संपुष्टात आली असून, काही काळ तरी सत्ता लष्कराच्या ताब्यात राहणार आहे. बांगला देशात गेल्या महिन्यापासून सरकारी नोकर्यांत आरक्षणाच्या विरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते आणि गेल्या काही दिवसांत त्यात पोलिस, विद्यार्थी व अन्य मिळून तीनशे तरी लोकांचा मृत्यू झाला. जमाव एवढा बेभान झाला होता की, त्याने बांगला देशचे राष्ट्रपिता मुजीबूर रहमान यांचा पुतळा फोडला. अशीच घटना अनेक वर्षांपूर्वी इराकचे अध्यक्ष सद्दाम हुसैन यांच्या पुतळ्याबाबत पाहायला मिळाली होती. आंदोलनात केवळ नोकर्या न मिळाल्यामुळे संतप्त झालेले तरुणच नव्हते, तर बांगला देश नॅशनालिस्ट पार्टी (बीएनपी) तसेच जमात इस्लामी या पक्षांचे कार्यकर्तेही होते. आंदोलनात घुसलेल्या गुंडांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानात घुसून लूटमार केली आणि संसदेतही धिंगाणा घातला. देशात ठिकठिकाणी लुटालूट आणि हिंसाचार माजला असून, अवामी लीगचे नेते आणि कार्यकर्त्यांवर हल्ले होत आहेत. ‘शेख हसीना आता राजकारणात परत येणार नाहीत. आपण कठोर परिश्रमाने बांगला देशला प्रगतिपथावर नेले, तरीही काही हितशत्रू विरोधात उभे राहिले आहेत, या कारणामुळे त्या निराश झाल्या होत्या,’ असे हसीना यांचे पुत्र सजीब वाजेद जॉय यांनी म्हटले आहे; मात्र याची दुसरी बाजूही लक्षात घेतली पाहिजे.
हसीना यांच्या नेतृत्वाखाली आगामी लीगने सलग तीन वेळा विजय मिळवला होता. गेल्या जानेवारीतच त्या पुन्हा सत्तेवर आल्या; परंतु सहा महिन्यांतच त्यांना देशातून पोबारा करावा लागावा, हे आश्चर्यकारक आहे. पण, अलीकडच्या या निवडणुकीत बोगस मतदान झाल्याचा आरोप होता. तसेच प्रमुख विरोधी पक्षांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे हसीना यांचा विजय निर्भेळ नव्हता. विरोधी पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात टाकणे, मतभेदांना बिलकुल थारा न देणे, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणे हे गेले दशकभर हसीना यांच्या राजवटीचे वैशिष्ट्य राहिले होते. वास्तविक दक्षिण आशियात बांगला देशी अर्थव्यवस्था सर्वाधिक गतीने वाढत आहे. बांगला देशच्या वस्त्रोद्योगाने जगात कमाल करून दाखवली आहे; परंतु ही प्रगती लोकांच्या आकांक्षांशी मेळ घालत नव्हती. गेल्या चार वर्षांत मात्र बांगला देशच्या अर्थव्यवस्थेतील त्याआधीचा जोम कमी झाला होता. त्यातच सरकारी नोकर्यांमध्ये स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसदारांनाही मोठेच आरक्षण ठेवले गेल्यामुळे, युवकांमध्ये तीव्र संतोष निर्माण झाला होता. त्याचवेळी सरकारने युवकांशी वाटाघाटी करणे आवश्यक होते, त्याऐवजी सुरक्षा बळाचा वापर करण्यात आला आणि आंदोलकांना गद्दार, देशद्रोही आणि रझाकार असे संबोधले. त्यामुळे युवक आणखी खवळून रस्त्यावर आले. तरीही सर्व देशावर आपलीच हुकूमत चालावी आणि देश विरोधी पक्षमुक्त असावा, हे हसीना यांचे धोरण त्यांच्या अंगाशी आले; मात्र त्याचवेळी हेसुद्धा खरे की, बांगला देशच्या राष्ट्रवादास आधुनिक आणि सेक्युलर वळण लावण्यात हसीना यांचा मोलाचा वाटा आहे.
बांगला देशात मुस्लिम राष्ट्रवादीही असून, त्यांना 1971 चा मुक्तिसंग्रामच मान्य नाही. हसीना यांचे वडील मुजीबूर हे बांगला देश मुक्तीसाठी लढत होते, तेव्हा देशातले अनेकजण पाकिस्तानी लष्कराशी मिळालेले होते व त्यांनाच ‘रझाकार’ असे संबोधले जाते; परंतु नोकर्यांसाठी लढणार्या लाखो तरुणांना सरसकट ‘रझाकार’ संबोधणे चुकीचेच होते. हसीना यांनी दडपशाही केली नसती, तर बांगला देशातील कट्टर इस्लामी व पाकिस्तानी प्रवृत्ती उफाळून वर आल्या नसत्या. बांगला देश मुक्तिसंग्राम यशस्वी झाला, तेव्हा रहमान यांनी मुक्तिवाहिनीच्या सैनिकांना लष्करात घेतले. त्याचवेळी ज्यांनी बांगला देश स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला नव्हता, त्यांना उपेक्षेची वागणूक दिली जात होती. त्यामुळे भडकलेल्या काही तरुण सैनिकांनी मुजिबूर व त्यांच्या सर्व कुटुंबीयांची हत्या केली. अपवाद केवळ शेख रेहाना आणि शेख हसीना या त्यांच्या दोन कन्यांचा. त्यानंतर लष्करात बंड होऊन, मुश्ताक अहमद हे अध्यक्ष बनले व मेजर जनरल झियाउर रहमान यांची लष्करप्रमुखपदी नेमणूक झाली; परंतु त्याच वर्षी आणखी एक बंड होऊन मुजिबूर यांचे समर्थक ब्रिगेडियर खालिद मुशर्रफ यांनी स्वतःची लष्करप्रमुखपदी नेमणूक करून घेतली व झियाउरना नजरकैदेत ठेवले. मुजिबूर यांच्या हत्येचा कट झियाउर यांनी रचल्याचा संशय होताच; परंतु चार दिवसांतच मुशर्रफ यांची हत्या झाली आणि झियाउर अध्यक्ष बनले.
1978 मध्ये त्यांनी ‘बीएनपी’ या पक्षाची स्थापना करून निडणुकाही जिंकल्या; मात्र त्यांची राजवट ही ‘पाकिस्तानवादी’ असल्याचा आरोप करून मेजर जनरल मंझूर यांनी ती 1981 मध्ये उलथवली. त्याच्या पुढच्याच वर्ष तत्कालीन लष्करप्रमुख इर्शाद यांनी रक्तहीन क्रांतीत सत्ता ताब्यात घेतली व ‘मार्शल लॉ’ पुकारला. थोडक्यात, बांगला देशात सातत्याने सत्तापालट झाला असून, लष्कराने वारंवार हस्तक्षेप केला आहे. बांगला देशात भारताच्या मदतीने क्रांती झाली आणि हसीना राजवटीत बांगला देश भारताचा जवळचा मित्र बनला. आज बांगला देशात हिंदू मंदिरांची तोडफोड केली जात आहे. माजी पंतप्रधान बेगम झिया यांचीही सुटका केली जाणार असून, त्यामुळे बांगला देश भारतापेक्षा पाकिस्तानच्या अधिक निकट जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. बांगला देश प्रभावाखाली राहावा, असे चीनचेही प्रयत्न आहेत. बांगला देशातील अराजकामुळे तेथून स्थलांतरितांचा ओघ भारताकडे वळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, भारत सरकारने परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवली पाहिजे. भारताशी संबध ठेवणे हे बांगला देशच्या आर्थिक हिताचे कसे आहे, या मुद्द्यावर जोर दिला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत तेथील नव्या राजवटीशी सलोख्याचे संबंध ठेवणे, हेच भारताचे धोरण असले पाहिजे. चीन, पाकिस्तान मागोमाग आणखी एका शेजारी देशाशी संबंध बिघडणे आपल्याला परवडणारे नाही.