पुढारी ऑनलाईन डेस्क
Russia-Ukraine crisis updates : रशिया युक्रेनवर कोणत्याही क्षणी हल्ला करु शकतो, अशी परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर, रशिया जी काही कृती करत आहे त्याचे परिणाम भयंकर असतील, असा इशारा अमेरिकेने दिला आहे. पूर्व युक्रेनमधील सैन्य तैनातीला शांतता अभियान म्हणणे हा रशियाचा "मूर्खपणा" आहे आणि रशियाने युक्रेनमधील लुहांस्क आणि डोनेस्टक या दोन प्रांतांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता देणे हा युद्धाचा एक भाग आहे, असे अमेरिकेने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत म्हटले आहे. रशिया-युक्रेन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक झाली. यात बहुतांश सदस्यांनी रशियावर जोरदार टीका केली आहे.
रशियाच्या कृतीचे परिणाम संपूर्ण युक्रेन, युरोप आणि जगभरात भयंकर होतील, असे संयुक्त राष्ट्रसंघाच्या १५ सदस्यीय कौन्सिलच्या आपत्कालीन बैठकीत संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेच्या राजदूत लिंडा थॉमस-ग्रीनफिल्ड (Linda Thomas-Greenfield) यांनी सांगितले. रशियाने युक्रेनच्या सीमेवर दीड लाख सैन्य तैनात केले आहे. यामुळे रशिया- युक्रेनमध्ये तणाव वाढला आहे. युक्रेनमधील लुहांस्क आणि डोनेस्टक या दोन प्रांतांना स्वतंत्र देश म्हणून रशियाने मान्यता दिली आहे. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी ही अधिकृतपणे घोषणा केली आहे. (Russia-Ukraine crisis updates)
"पुतिन यांनी मिन्स्क कराराची चिरफाड केली आहे. ते यावर थांबतील यावर आमचा विश्वास नाही," अशा शब्दांत थॉमस-ग्रीनफिल्ड यांनी खडे बोल सुनावले आहेत. त्यांनी पूर्व युक्रेनमधील युक्रेनियन सैन्य आणि रशियन समर्थक फुटीरतावादी यांच्यातील संघर्ष संपवण्याच्या उद्देशाने तयार केलेल्या २०१४ आणि २०१५ च्या करारांचा संदर्भ देत रशियाच्या कृतीवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
युक्रेनच्या प्रादेशिक अखंडतेवर आणि सार्वभौमत्वावर रशिया विनाकारण कारवाई करत आहे. हा युक्रेनच्या संयुक्त राष्ट्र सदस्य राष्ट्राच्या दर्जावर हल्ला आहे. हे आंतरराष्ट्रीय कायद्याच्या मूलभूत तत्त्वांचे उल्लंघन आहे, असेही अमेरिकेने नमूद केले आहे.
यावर रशियाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "आम्ही राजनैतिक उपाय काढण्यासाठी तयार आहोत, रक्तपात करण्याचा आमचा हेतू नाही." असे संयुक्त राष्ट्रसंघातील रशियाचे राजदूत वॅसिली नेबेंझिया यांनी म्हटले आहे.
चीनचे UN मधील राजदूत झांग जून म्हणाले, "द्विपक्षीय देशांनी संयम बाळगला पाहिजे आणि तणाव वाढवणारी कोणतीही कृती टाळली पाहिजे." दरम्यान, अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्ससह आठ देशांच्या कौन्सिल सदस्यांनी पुतीन यांच्या घोषणेनंतर सुरक्षा परिषदेची बैठक घेण्याच्या युक्रेनच्या विनंतीला पाठिंबा दर्शवला होता.
केनियाचे UN मधील राजदूत मार्टिन किमानी यांनी आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या रशियाच्या कृतीचा निषेध नोंदवला आहे.
हे ही वाचा :