पुढारी ऑनलाईन डेस्क : पुढील वर्षी विजयादशमीपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शतक महोत्सव साजरा होणार आहे. शतक महोत्सवाचा भाग म्हणून संघ शिक्षा वर्गात (ऑफिसर्स ट्रेनिंग कँप) बदल केले जाणार आहेत. शिवाय स्वयंसेवकांच्या हाती असणाऱ्या 'दंडां'ची लांबीही कमी करण्याचा विचार आहे. (RSS Centenary)
स्वराज्य आणि इंडियन एक्सप्रेस यांनी या संदर्भात वृत्त दिले आहे. संघाच्या स्वयंसेवकांच्या गणवेशात दंडाचा अधिकृतरीत्या समावेश नसला तरी दंड ही स्वयंसेवकांची गेल्या शंभर वर्षांतील ओळख बनली आहे. उटी येथे १३ ते १५ जुलै या कालावधीत संघाच्या बैठकीत या संदर्भात चर्चा झाली. या बैठकीत सुचवण्यात आलेल्या सूचनांची घोषणा अधिकृतरीत्या केंद्रीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीत होणे अपेक्षित आहे, असे या बातमीत म्हटले आहे.
सध्या प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्षाचे प्रशिक्षण २० दिवसांचे असते. तर तृतीय वर्षाचे प्रशिक्षण २५ दिवसांचे असते. ते नागपूर येथे आयोजित केले जाते. उटी येथील बैठकीत प्रशिक्षणाचा कालावधित बदल केला जावा, अशी सूचना करण्यात आली आहे. प्रथम वर्षाचे प्रशिक्षण हे १५ दिवसांचे तर द्वितीय आणि तृतीय वर्षांचे प्रशिक्षण प्रत्येकी २० दिवसांचे केले जावे, अशा सूचना करण्यात आलेल्या आहेत.
प्रथम वर्षाच्या प्रशिक्षणाचे ना संघ शिक्षा वर्ग असे केले जाईल, तर द्वितीय आणि तृतीय वर्षाचा प्रशिक्षणाचे नाव कार्यकर्ता विकास शिबिर असे करण्याचा विचार आहे.
स्वयंसेवकांकडे असणारा दंड सध्या पाच फूट तीन इंच इतक्या लांबीचा असतो, तो तीन फूट लांबीचा करण्यात यावा असाही विचार आहे; पण यावर कोणताही निर्णय झालेला नाही. संघाच्या वतीने सर्वसाधारण एप्रिल ते जून आणि काहीवेळा थंडीत शिबीर घेतली जातात. यावर्षी देशभरात शंभर शिबीरातून २० हजार स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.शारीरिक प्रशिक्षणाचा कालावधी कमी करून बौद्धिक प्रशिक्षणावरील भर वाढण्यात येणार असल्याचे या वृत्तात म्हटले आहे.
हेही वाचा