

नवी दिल्ली, 22 सप्टेंबर (पुढारी वृत्तसेवा) : RSS Chief राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे मुख्य इमाम उमर अहमद इलियासी यांची भेट घेतली. सामाजिक सौदाहार्य वाढविण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून या भेटीकडे पाहिले जात आहे. कस्तुरबा गांधी मार्गावर असलेल्या मशिदीत इमाम ऑर्गनायझेशनचे कार्यालय आहे. त्या ठिकाणी जाऊन भागवत यांनी ही भेट घेतली. याआधी दिल्लीचे माजी उपराज्यपाल नजीब जंग तसेच काही मुस्लिम मान्यवरांना भागवत भेटले होते.
RSS Chief सरसंघचालक सर्व क्षेत्रातील लोकांना भेटत असतात. ही एक सामान्य संवाद प्रक्रिया असल्याची प्रतिक्रिया संघाचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना दिली.
मोहन भागवत आणि इमाम इलियासी यांची सुमारे तासभर बंद खोलीत चर्चा झाली. यावेळी संघाचे वरिष्ठ पदाधिकारी कृष्ण गोपाल तसेच इंद्रेश कुमार उपस्थित होते.
अलिकडील काळात RSS Chief भागवत यांनी ज्या मुस्लिम लोकांची भेट घेतली होती, त्यात सईद शेरवानी, शाहिद सिद्दीकी, जमीरुद्दीन शाह, माजी निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांचा समावेश होता. जमियत उलेमा ए हिंदचे नेते मौलाना अरशद मदनी यांनी 2019 साली संघाच्या झंडेवालान येथील मुख्यालयात जात मोहन भागवत यांची भेट घेतली होती.
जातीय सलोखा मजबूत करण्यासाठी RSS Chief भागवत मुस्लिम विचारवंतांशी चर्चा करत आहेत. काल देखील, त्यांनी अनेक मुस्लिम विचारवंतांची भेट घेतली आणि अलीकडील वाद आणि देशातील धार्मिक समावेशकता मजबूत करण्याच्या मार्गांवर चर्चा केली.
आरएसएसच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संघाच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी आणि धार्मिक समावेशकतेच्या विषयाला चालना देण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. ज्ञानवापी वाद, हिजाब वाद, लोकसंख्या नियंत्रण यासारख्या अलीकडच्या घटनांवर बैठकीत चर्चा झाली.