file photo 
Latest

Rohit Sharma Century : शतकाच्या दुष्काळावर रोहित शर्माने सोडले मौन, म्हणाला; ‘मी बदलतोय…’

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rohit Sharma Century : टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून मालिका खिशात घातली आहे. घरच्या मैदानावर टीम इंडियाचा हा सलग 7 वा मालिका विजय आहे. याआधी टीम इंडियाने श्रीलंकेचा 3-0 ने पराभव करून वनडे मालिका जिंकली होती. या सगळ्यात टीम इंडियाची सर्वोत्तम फलंदाजी हा चर्चेचा विषय ठरला आहे. त्याचवेळी भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या बदललेल्या स्टाईलचेही कौतुक होत आहे. मात्र तीन वर्षांपासून सुरू असलेला शतकी दुष्काळ रोहित कधी संपवणार याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. आता खुद्द रोहितनेच याबाबत मौन सोडले आहे.

वनडेमध्ये तीन द्विशतके झळकावणाऱ्या हिटमॅनने शेवटचे वनडे शतक जानेवारी 2020 मध्ये केले होते. यापूर्वी अर्धशतकानंतर चुटकीसरशी शतक पूर्ण करणारा रोहित ब-याच काळापासून अपयशी ठरला आहे. रायपूरमध्ये सामना जिंकल्यानंतर रोहितला त्याच्या वनडेतील शतकाबद्दल विचारण्यात आले. या प्रश्नाला उत्तर देताना तो म्हणाला की, मी माझ्या फलंदाजीबद्दल समाधानी आहे. अनेक दिवसांपासून मी वनडेमध्ये तीन आकडी धावसंख्या गाठू शकलो नाही. पण मी त्याची काळजी करत बसत नाही. (Rohit Sharma Century)

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही रोहितने 50 चेंडूत सात चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 51 धावांची शानदार खेळी केली. पण लगेचच त्याने विकेट गमावली. याआधी, श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेतही त्याने 83 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली, पण त्यावेळीही त्याला शतकाने हुलकावणी दिली. पण गेल्या दोन मालिकांपासून त्याची शैली बदललेली दिसते. याबाबत रोहितने रायपूर वनडेनंतर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, मी माझ्या खेळात थोडा बदल करण्याचा प्रयत्न करत आहे. गोलंदाजांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यामुळे सुरुवातीपासून मी गोलंदाजांविरुद्ध आक्रमक भूमिका घेत आहे. ही माझी नवी रणनिती आहे. यात मला वैयक्तीक मोठी धावसंख्या करता आलेली नाहीत. पण मला त्याची फारशी चिंता नाही,' असे स्पष्ट मत मांडले.

मी माझ्या फलंदाजीवर आनंदी… (Rohit Sharma Century)

या वर्षाच्या अखेरीस भारतीय संघाला घरच्या भूमीवर 50 षटकांचा विश्वचषक खेळायचा आहे. या जागतिक स्पर्धेच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर कर्णधार हिटमॅन पुढे म्हणाला, मी माझ्या फलंदाजीवर खूश आहे. माझे विचार अगदी स्पष्ट आहेत. मी ज्या पद्धतीने खेळत आहे त्यामुळे मी आनंदी आहे. मला माहित आहे की लवकरच मोठी धावसंख्या उभारली जाणार आहे. संघाला विश्वचषकापूर्वी सर्व प्रकारचे प्रयोग करायचे आहेत. रायपूर वनडेत टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. गेल्या पाच सामन्यांमध्ये त्यांचे प्रदर्शन खरोखरच चांगले झाले आहे, असे मला वाटले.

आधी श्रीलंका आणि आता न्यूझीलंड विरुद्धच्या वन-डे मालिकांमध्ये भारतीय फलंदाजांनी धुमाकूळ घातला आहे. त्याचबरोबर गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली आहे. मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी ही जोडी विरोधी संघाला नेस्तनाबूत करण्यात सातत्याने यशस्वी होत आहे. तर कुलदीप यादव फिरकी विभागाची धुरा चांगल्या प्रकारे सांभाळत आहे. त्याचवेळी हार्दिक पंड्याही महत्त्वाच्या प्रसंगी उपयुक्त ठरतोय. हैदराबाद एकदिवसीय सामन्यात हार्दिकचे 49 वे षटक आणि रायपूर वनडेतील किफायतशीर गोलंदाजी टीम इंडियासाठी प्लस पॉइंट ठरली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT