पुढारी ऑनलाईन डेस्क : व्यतिगत बदला घेण्यासाठी सरकार पाडताना दाखवली तशी कलाकारी सीमाप्रश्नी महाराष्ट्राची बाजू मांडताना का दाखवली जात नाही? पोलिसांना चकवा देऊन रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येऊ शकतं तसं मंत्र्यांना कर्नाटकला का पाठवलं नाही? असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते रोहीत पवार (Rohit Pawar) यांनी ट्विट करत राज्य सरकारला केला आहे.
गेले काही दिवस कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावरुन महाराष्ट्रात वातावरण चांगलचं तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी यांनी सीमाप्रश्नावर केलेल्या विधानांमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने नियुक्त केलेले महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न समन्वयक चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई आणि उच्चाधिकार समिती अध्यक्ष खासदार धैर्यशील माने यांचा मंगळवारी (दि.६) बेळगाव दौरा नियोजित होता. मात्र हा दौरा रद्द करण्यात आला. मंगळवारी (दि.६) बेळगाव-हिरेबागेवाडी येथील टोल नाक्यावर 'कन्नड रक्षण वेदिका संघटने'च्या कार्यकर्त्यांनी काही वाहनांवर दगडफेक केली. त्यामुळे दोन्ही राज्यांत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाराष्ट्राशी गद्दारी करणं बरं नाही गेल्या काही महिन्यांपासुन महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच उलथापालथ झाली. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतील बंडानंतर महाराष्ट्राचं राजकारण नाट्यमयरित्या बदललं. त्यानंतर शिवसेना कोणाची, चिन्ह कोणाचं, दसरा मेळावा शिवाजी पार्कवर कोण घेणार असे बरेच वाद निर्माण झाले. बोम्मईंच्या भूमिकेने कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्न पुन्हा उफाळला.
आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते रोहीत पवार यांनी सरकारला खोचक ट्विट करत टोमणा मारला आहे," व्यतिगत बदला घेण्यासाठी सरकार पाडताना दाखवली तशी कलाकारी सीमाप्रश्नी महाराष्ट्राची बाजू मांडताना का दाखवली जात नाही? पोलिसांना चकवा देऊन रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येऊ शकतं तसं मंत्र्यांना कर्नाटकला का पाठवलं नाही? रोहित पवार यांनी आणखी एक ट्विट करत धारेवर धरलं आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, "आपल्या अस्मितेशी छेडछाड होत असताना बघू… करू… केंद्राशी बोलू… ही मूळमुळीत भाषा कशासाठी? कर्नाटकच्या आगामी निवडणुकांसाठी महाराष्ट्राशी गद्दारी करणं बरं नाही!
हेही वाचा