खडकवासला : पुढारी वृत्तसेवा
धायरी येथे उंच डोंगर माथ्यावरील शिवकालीन श्री खंडोबा मंदिरात अत्यंत दुर्मिळ रॉक लेपो जातीच्या तीन पालींचे वास्तव्य असल्याचे पुढे आले आहे.
येथील खंडोबा मंदिरात या तीन पाली सध्या आहेत. आसपासच्या डोंगर परिसरात अशा दुर्मिळ पाली असाव्यात, असे खंडोबा सेवा समितीचे विश्वस्त अॅड. उमेश पोकळे यांनी सांगितले. नेहमीप्रमाणे परवा रविवारी अॅड. पोकळे हे मंदिर परिसरातील झाडांना पाणी घालण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना मंदिरातील गाभार्याच्या छतावर वेगळ्या प्रकारच्या तीन पाली दिसल्या. वन्यजीव अभ्यासक गायत्री राजगुरव यांना पालींचे फोटो पाठवून माहिती देण्यात आली. खंडोबा मंदिरात दगडी पाल म्हणजेच रॉक लेपो जातीच्या पाली असल्याचे राज गुरव यांनी स्पष्ट केले आहे, असे असे अॅड. पोकळे यांनी सांगितले.
दगडी पालींचा रंग काळा पिवळसर आहे. तसेच, बिबट्याप्रमाणे तिच्या अंगावर ठिपके असून, तिचा आकार घरात आढळणार्या पालीपेक्षा दोन ते तीनपट अधिक आहे. सध्या कडक उन्हाळा असल्याने पाली मंदिराच्या बाहेरच्या भिंतीवर येत आहेत. या पालींचे अन्न, किटक आहे. या पाली दुर्मिळ असल्याने त्यांची कोणतीही हानी करू नये, असे आवाहन खंडोबा सेवा समितीने केले आहे.