Latest

Rishabh Pant : माझा वेळ संपला आहे, असे वाटले..!

Shambhuraj Pachindre

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : मला वाटले माझा या जगातील वेळ आता संपला आहे, अशा शब्दांत ऋषभ पंतने आपल्या अपघाताच्या आठवणी सांगितल्या. डिसेंबर 2022 मध्ये भारतीय क्रिकेट स्टार ऋषभ पंत आपल्या कुटुंबासोबत नवीन वर्ष साजरे करण्यासाठी रुरकीहून नवी दिल्लीला जात असताना वाटेत त्याचा भीषण अपघात झाला होता. जवळपास वर्षानंतर पंतने एका कार्यक्रमादरम्यान त्या क्षणी काय वाटले हे सांगितले आहे. (Rishabh Pant)

अपघातात पंतच्या उजव्या गुडघ्याचा लिगामेंट फाटला होता आणि कपाळावर जखमा झाल्या. हा 26 वर्षीय यष्टिरक्षक फलंदाज तेव्हापासून क्रिकेटपासून दूर आहे. स्टार स्पोर्टस्शी बोलताना पंत म्हणाला की, पहिल्यांदा मला वाटले की, या जगात माझा वेळ संपला आहे. मी खूप नशीबवान होतो. कारण, ही घटना खूप वाईट असू शकते. डॉक्टरांनी सांगितले की, तुला बरे होण्यासाठी 16 ते 18 महिने लागतील. मला दुसरे जीवन मिळाले हे माझे भाग्य आहे. प्रत्येकाला दुसरे जीवन मिळत नाही. (Rishabh Pant)

या अपघाताच्या एका वर्षानंतर पंत आता बरा झाला आहे आणि लवकरच तो मैदानात परतताना दिसणार आहे. डिसेंबरमध्ये झालेल्या 'आयपीएल' लिलावात पंत दिल्ली कॅपिटल्सच्या टेबलावर बसून बोली लावताना दिसला होता. पंतच्या अनुपस्थितीत दिल्ली कॅपिटल्सची गेल्या वर्षीची कामगिरी काही खास नव्हती; पण यावेळी पंत काही नवीन कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.

ऋषभ पंतने आतापर्यंत 33 कसोटी सामन्यांमध्ये 43.67 च्या सरासरीने 2271 धावा केल्या आहेत ज्यात 5 शतके आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने 66 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तीन अर्धशतकांच्या मदतीने 987 धावा केल्या आहेत. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पंतने 30 सामन्यांमध्ये 34.60 च्या सरासरीने 865 धावा (1 शतक, 5 अर्धशतके) केल्या आहेत.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT