gowardhan dairy it raid : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये प्राप्तीकर विभागाची कारवाई सुरु आहे. उद्योजक देवेंद्र शहा यांच्या उद्योग व्यवसायांसह घरावर छापेमारी सुरु आहे. पराग आणि गोवर्धन मिल्क उद्योग समुहावर प्राप्तीकर विभागाने गुरुवारी( दि.२५) पहाटे छापेमारी केली.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव तालुक्यात प्राप्तीकर विभागाच्या छापेमारीमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
पराग मिल्क आणि गोवर्धन उद्योग समुहाचे दुध उत्पादनात जगभरात जाळे आहे. अवसरी येथील पीरसाहेब डेअरीचे पराग मिल्कसोबत काही व्यवहार आढळुन आल्याने प्राप्तीकर विभागाची कारवाई सुरु असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
मंचर येथील पराग डेअरीमध्ये गुरुवारी पहाटे अडीच वाजता प्राप्तीकर विभागाने छापा मारला. तर अवसरी येथील पीर डेअरीमध्ये पहाटे साडेतीन वाजता छापा मारला.
देवेंद्र शहा यांच्या निवासस्थानी सकाळी सात वाजता तर देवेंद्र शहा यांच्या मित्राच्या घरी सकाळी नऊ वाजता प्राप्तीकर विभागाने छापा मारला. प्राप्तीकर विभागाकडून दप्तर तपासणी सुरुच आहे. प्राप्तीकर विभागाच्या चार टीम छापेमारीमध्ये सहभागी आहेत.
दरम्यान राज्यात ईडी, सीबीआय, नंतर आता प्राप्तीकर विभागाने छापेमारी करायला सुरुवात केली आहे. अनेक बडे लोक,उद्योजक आयटीच्या रडारवर आहेत.
मागच्या काही दिवसात प्राप्तिकर विभागाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या घरी छापेमारी केली होती.
आता थेट राज्याचे गृहमंत्री ज्या मतदार संघातून निवडून आले आहेत.
त्या आंबेगाव तालुक्यामध्ये छापेमारी केली आहे. आता तपासणीत काय सापडले हे तपासाअंती समोर येईल.