Latest

G20 Summit : परस्परांतील अविश्वास दूर करा- PM मोदी

backup backup

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा – G20 Summit : जगभराचे लक्ष लागून असलेल्या जी–२० शिखर परिषदेस आज औपचारिकरित्या प्रारंभ झाला. जागतिक नेत्यांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या परिषदेचे उद्घाटन करताना, " जगभरात सध्या परस्पर विश्वासाचा असलेला अभाव" या वैश्विक समस्येवर बोट ठेवले. ही वेळ जगाला नवी दिशा दाखविणारी असल्याचे सांगताना मोदींनी सर्वांना एकत्र येण्याचे आवाहनही केले. यावेळी पंतप्रधानांनी यजमानपदाचा उल्लेख करताना इंडिया ऐवजी भारत या नावाचा आवर्जून केलेला वापर, उल्लेखनीय ठरला.

G20 Summit : वन अर्थ (एक पृथ्वी), वन फॅमिली (एक कुटुंब) आणि वन फ्यूचर (एक भविष्य)

जागतिक नेत्यांचा समावेश असलेली जी–२० शिखर परिषद, संमलेन स्थळ असलेल्या भारत मंडपममध्ये आज सकाळी साडेनऊ वाजता सुरू झाली. प्रारंभी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणार्कच्या प्राचीन सूर्यमंदिरातील कालचक्राच्या प्रतिकृतीच्या पार्श्वभूमीवर आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. या परिषदेमध्ये वन अर्थ (एक पृथ्वी), वन फॅमिली (एक कुटुंब) आणि वन फ्यूचर (एक भविष्य) या तीन सत्रांमध्ये सर्व वैश्विक नेते सहभागी होणार आहेत. या परिषदेचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी–२० चे अध्यक्ष या नात्याने भारतातर्फे संपूर्ण जगाला परस्पर विश्वास वाढविण्याचे आवाहन केले. तत्पूर्वी, पहिल्या सत्राच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदींनी आफ्रिकन युनियनच्या प्रमुखांना जी–२० चे स्थायी सदस्य म्हणून आपले स्थान घेण्याचे निमंत्रण दिले.

G20 Summit : 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास'

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, २१ व्या शतकातील ही वेळ जगाला नवी दिशा दाखवण्याची वेळ आहे. वर्षानुवर्षे जुनी आव्हाने आपल्याकडून नवीन उपायांची मागणी करत आहेत. आपल्याला मानवतावादी दृष्टीकोनातून या समस्या सोडवायला हव्यात. आपण एकत्रितपणे या समस्या सोडवू शकतो असा आपल्याला विश्वास आहे, असेही मोदी म्हणाले. कोविड महामारीच्या काळानंतर संपूर्ण जगात परस्पर विश्वासाचा अभाव असल्याचे दिसते. युद्धामुळे हा अविश्वास आणखी वाढला आहे. अशा काळात 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास' ही संकल्पना मानव–केंद्रित दृष्टिकोनासह संपूर्ण जगाला मार्गदर्शन करू शकतेस, असेही प्रतिपादन पंतप्रधान मोदींनी केले.

जी–२० परिषदेनिमित्त भारतात ६० हून अधिक शहरांमध्ये २०० हून अधिक कार्यक्रमांचे आयोजन झाले असून परिषद एका अर्थाने भारतातील लोकांची जी–२० बनल्याची टिप्पणी मोदींनी केली. तसेच जी–२० च्या अध्यक्षपदावरून भारत संपूर्ण जगाला आवाहन करतो की, विश्वासाच्या अभावाचे रूपांतर एकमेकांवरील विश्वासात करावे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मोरोक्कोमधील भूकंपात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली. या कठीण काळात संपूर्ण जागतिक समुदाय मोरोक्कोसोबत आहे. त्यांना शक्य ती सर्व मदत देण्यास तयार आहोत, अशीही ग्वाही त्यांनी दिली.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT