मडगाव; पुढारी वृत्तसेवा : एका अल्पवयीन मुलीवरील कथित बलात्कार प्रकरणात अडकलेले वादग्रस्त मंत्री बाबूश ऊर्फ आतानसियो मोन्सेरात यांना न्यायालयाने आज (दि. ५) दिलासा दिला. बलात्काराच्या खटल्याला हजर राहण्यापासून न्यायालयाने त्यांना कायमची सूट दिली आहे. या खटल्याची सुनावणी आता ५ जूनपासून दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी होणार आहे. (Goa News)
पणजीचे आमदार आणि मंत्री बाबुश मोन्सेरात यांनी बलात्कार प्रकरणाच्या खटल्याला उपस्थित राहण्यापासून कायमस्वरूपी सूट मिळावी, यासाठी न्यायालयाकडे अर्ज दाखल केला होता. तो अर्ज मंजूर करताना न्यायालयाने त्यांना सूट दिली आहे.
दरम्यान, जूनपासून न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी जलद गतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दर आठवड्याला या खटल्याच्या तीन वेळा सुनावण्या होणार आहेत. २०१६ मध्ये एका किशोरवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली मोन्सेरात यांच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. बलात्कार प्रकरणात गुन्हा नोंद होणारे ते गोव्यातील पाहिले मंत्री आहेत. पीडितेने मे २०१६ मध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला होता. आपल्या आईने ५० लाख रुपयांच्या मोबदल्यात आपल्याला मोन्सेरात यांना विकले होते. नंतर मॉन्सेरात यांनी तिला अंमली पदार्थ पाजून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप तिने केला होता. न्यायमूर्ती इर्शाद आगा यांच्या न्यायालयात हा खटला नुकताच दक्षिण गोवा प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला आहे. (Goa News)
हेही वाचा