मुंबई; पुढारी ऑनलाईन : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षातून केलेल्या बंडखोरीमुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला. यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. राजकीय अस्थिरतेच्या या वातावरणात बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दोनवेळा फोन करून मनसे चर्चा केली. मात्र यामुळे अनेकांच्या मनात संशयाचे ढग दाटून आले. या दोघांमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली असेल यावरून महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली नाही तर नवल…
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते रूग्णालयातच होते. या दरम्यान महाराष्ट्रात शिवसेनेच्या ४० आमदारांच्या बंडामुळे राजकारण ढवळून निघाले. त्यातच उपचारानंतर राज ठाकरेंना रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याने ते घरी आले आहेत. त्यांच्या तंब्बेतीची सर्वजण विचारपूस करत आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनीही राज ठाकरे यांना एक नव्हे तर दोनवेळा फोन केला आणि सविस्तर चर्चा केली.
शिंदे यांनी राज यांना त्यांच्या प्रकृतीची विचारपूस तर केलीच, शिवाय महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही चर्चा केल्याची माहिती मनसेच्या एका नेत्याकडून समोर येत आहे. यामुळे सबंध महाराष्ट्रातील कार्यकर्ते तसेच सर्वसामान्यांमध्ये चर्चेचे गुन्हाळ रंगले आहे. त्यातच ४० आमदारांचा गट मनसेमध्ये विलिन होण्याच्या बातम्याही समोर येत आहेत. त्यामुळे या दोघांमध्ये प्रकृतीच्या विचारपुसी शिवाय नेमकी काय चर्चा झाली असेल हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. तोपर्यत राजकीय पटावर घडणाऱ्या नाट्यमय घडामोडींमध्ये आणखीन रंगत चढली आहे.
हे ही वाचलंत का?