औरंगाबाद : शिंदे गटाकडून 50 कोटींची ऑफर होती; आमदार उदयसिंह राजपूत यांचा दावा | पुढारी

औरंगाबाद : शिंदे गटाकडून 50 कोटींची ऑफर होती; आमदार उदयसिंह राजपूत यांचा दावा

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामिल होण्यासाठी आपल्याला पन्नास कोटींची ऑफर होती असा दावा कन्नडचे शिवसेना आमदार उदयसिंह राजपूत यांनी केला आहे. तसेच मला शंभर कोटी रुपये दिले तरी मी शिवसेनेसोबत गद्दारी करणार नाही, असेही ते महणाले.

शिवसेनेच्या जवळपास चाळीस आमदारांनी बंड पुकारले आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील पाच आमदारांचा समावेश आहे. जिल्ह्यातील कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत हे मात्र शिवसेनेसोबत एकनिष्ठ राहिले आहेत. आपल्यालाही शिंदे गटात सहभागी होण्यासाठी पन्नास कोटींची ऑफर होती, परंतु ती आपण नाकारली असा दावा आता त्यांनी केला आहे. राजपूत यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत रविवारी पत्रकारांना त्याविषयीची माहिती दिली. राजपूत म्हणाले, ’माझ्याकडे दोन चारचाकी भरुन पैसे आले होते, त्याचे फुटेजही माझ्याकडे आहेत. 100 कोटी दिले असते तरी मी गद्दारी केली नसती. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना
यांच्याबाबत कोणतीही गद्दारी करणार नाही. मला ऑफर होती मात्र, मी गद्दारी केली नाही’. असेही त्यांनी स्पष्ट केले.

Back to top button