पुढारी ऑनलाईन डेस्क : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) Paytm बॅकेच्या सेवांवर बंदी घालत कंपनीला मोठा धक्का दिला होता. कर्ज व्यवहार आणि कोणत्याही प्रकारच्या ठेवी घेण्याच्या व्यवहारांवर बंदी घालण्याची घोषणा RBI कडून करण्यात आली होती. आता आरबीआयने स्पष्ट केले आहे की, शुक्रवार १५ मार्चची अंतिम मुदत संपल्यानंतरही Paytm च्या क्यूआर कोड, साउंडबॉक्स आणि कार्ड मशीनशी संबंधित सर्व सेवा नियमितपणे सुरू राहतील. RBI च्या या निर्णयामुळे Paytm कंपनीला मोठा दिलासा मिळाला आहे. (RBI On Paytm's Service)
'बिझनेस टुडे'च्या रिपोर्टनुसार, 'आरबीआय'ने म्हटले आहे की, Paytm पूर्वीप्रमाणेच आपली व्यापारी सेवा सुरू ठेवू शकते. Paytm शी संबंधित व्यापाऱ्यांना सक्षम करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. कारण असा प्रकारची सेवा घेणार्या व्यापाऱ्यांची संख्या देशात खूप आहे. याचा अर्थ आता दुकानदारांना QR कोड, साउंडबॉक्स आणि कार्ड मशिनद्वारे कोणत्याही अडचणीशिवाय पैसे भरता येणार आहेत. वास्तविक, ही सेवा सुरू ठेवण्यासाठी, पेटीएमची मूळ कंपनी One97 कम्युनिकेशनने त्यांचे नोडल खाते ॲक्सिस बँकेत शिफ्ट केले आहे. हे एक मास्टर खाते आहे जे सर्व ग्राहक आणि व्यापारी यांच्यातील व्यवहार पूर्ण करते. (RBI On Paytm's Service)
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नियमांचे पालन न केल्याने पेटीएम पेमेंट्स बँकेवर कारवाई केली होती. बुधवार ३१ जानेवारी रोजी आरबीआयने पेटीएम बँकेच्या सेवांवर बंदी घालण्याचा आदेश जारी केला होता. त्यासाठी गुरूवार २९ फेब्रुवारीची मुदत निश्चित करण्यात आली होती. नंतर ही मुदत शुक्रवार १५ मार्चपर्यंत वाढवण्यात आली. (RBI On Paytm's Service)
11 मार्च 2022 रोजी आरबीआयने Paytm कंपनीला नोटीस बजावली होती. यामध्ये तुमची पेमेंट बँक नवीन ग्राहक जोडू शकत नाही, असे सांगण्यात आले. आरबीआयने असेही म्हटले होते की, तुमच्या पेमेंट बँकेचे आयटी टीमकडून सिस्टम ऑडिट केले जाईल. पेटीएम हे पेमेंट गेटवे तसेच बँकिंग प्लॅटफॉर्म असल्याने तपास पूर्ण होईपर्यंत नवीन ग्राहक जोडले जाऊ नयेत, असेही कंपनीला सांगण्यात आले हाेते. पेटीएमच्या सिस्टीमचे ऑडिट करण्यात आले तेव्हा अहवाल आरबीआयकडे गेला. ऑडिट अहवालात पेटीएमच्या प्रणालीतील अनेक त्रुटी समोर आल्या आणि पेमेंट बँकेने आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन केल्याचेही उघड झाले. यानंतर आरबीआयने 1949 च्या बँकिंग रेग्युलेशन कायद्याच्या कलम 35A या अनुच्छेदानुसार, निर्देश जारी केले हाेते.