

पुढारी ऑनलाईन डेस्क : RBI vs Paytm Payments Bank : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) पेटीएमला मोठा दिलासा देत 15 दिवसांची सूट दिली आहे. आता पेटीएम पेमेंट्स बँकेवरील निर्बंध मर्यादा 29 फेब्रुवारीपासून लागू होणार नसून ती आणखी 15 दिवसांनी वाढवण्यात आली आहे. आता पेटीएम पेमेंट्स बँकेवर बंदी 15 मार्चनंतर लागू होईल. याचा अर्थ पेटीएम वॉलेट, फास्टॅग आणि ग्राहकांच्या खात्यांमध्ये 15 मार्च 2024 पर्यंत व्यवहार करता येतील. यासोबतच आरबीआयने पेटीएमबाबत वारंवार विचारले जाणारे प्रश्नही जारी केले आहेत.
खरं तर, 31 जानेवारी 2024 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेने एक मोठे पाऊल उचलले आणि पेटीएमची बँकिंग सेवा बंद करण्याचा आदेश जारी केला. हा आदेश 29 फेब्रुवारी 2024 पासून लागू होणार होता, परंतु आता या तारखेत सुधारणा करण्यात आली आहे. आरबीआयने 31 जानेवारी रोजी सांगितले होते की, पेटीएम पेमेंट्स बँकेवर नियामक कारवाई करण्यात आली आहे, ज्यामुळे 29 फेब्रुवारीनंतर पेटीएम पेमेंट्स बँक खात्यातील व्यवहार, पेटीएम वॉलेट, फास्टॅग आणि टॉपअप यासारख्या सेवा बंद होतील. (RBI vs Paytm Payments Bank)
आरबीआयने म्हटले आहे की, आम्ही बँकींग नियमन अधिनियम 1949 च्या कलम 35 ए नुसार पेटीएमची मूळ कंपनी वन97 (One97) कम्युनिकेशन्सद्वारे संचालित पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडवर काही व्यावसायिक निर्बंध लादले आहेत. पण ग्राहकांचे हित लक्षात घेता पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडवर बंदी घालण्याच्या तारखेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.