जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत बुधवारी (दि.२४) उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी घेण्यात आलेल्या जाहीर सभेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, विधानसभेचे माजी सभापती हरिभाऊ बागडे, मंत्री अब्दुल सत्तार, आ.संतोष दानवे, आ.नारायण चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आ. अरविंद चव्हाण, भास्करराव दानवे, अॅड. ब्रम्हानंद चव्हाण, मनसे जिल्हाध्यक्ष रवि राऊत,गजानन गिते, सुहास सिरसाट, भाजपा जिल्हाध्यक्ष बद्री पठाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी शहरातील जनार्धन मामा चौक, सिंधी बाजार, फुलबाजार, सराफा, काद्राबाद, पाणीवेश, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, गांधी चमन, शनि मंदिर मार्गे ढोल ताशाच्या गजरात भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत चारचाकी वाहनात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह रावसाहेब दानवे, अब्दुल सत्तार, हरिभाऊ बागडे हे सहभागी झाले होते. रॅली दुपारी साडेतीनच्या सुमारास जुना जालन्यातील कल्याणराव घोगरे स्टेडिअमवर नेण्यात आली. या ठिकाणी रॅलीचे रुपांतर सभेत झाले.
यावेळी बोलताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले, जालना लोकसभा मतदारसंघात विविध विकास कामे आपण केली आहेत. ड्रायपोर्ट, रेल्वे पीटलाईनसह रेल्वेचे विद्युतीकरण यासह इतर विकास कामे केली आहेत. उर्वरित विकास कामे करण्यासाठी पुन्हा निवडून द्या, असे अवाहन त्यांनी केले.
भाजप राज्यघटना बदलणार असल्याचा आरोप काँग्रेस करीत आहे. हा आरोप खोटा आहे. खर्या अर्थाने पंतप्रधान हेच राज्यघटनेची अंमलबजावणी करीत आहे, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी बोलताना केले. देशाची राज्यघटना कोणीही बदलू शकत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची राज्यघटना कश्मीरमध्ये लागू व्हावी, असे काँग्रेसला वाटले नाही. देशाची राज्यघटना पंतप्रधान मोदी हे मजबुत करीत आहेत, असेही ते यावेळी म्हणाले.
हेही वाचा :