Lok Sabha Elections 2024 : दुसऱ्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावल्या, २६ एप्रिलला देशात ८९ तर राज्यात ८ मतदारसंघात मतदान

प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : Lok Sabha Elections 2024 : देशात लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यातील प्रचारतोफा आज (बुधवार) संध्याकाळी ५ वाजता थंडावल्या. २६ एप्रिलला देशभरात ८९ लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील ८ लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, परभणी, नांदेड, हिंगोली या लोकसभा मतदारसंघांचा दुसऱ्या टप्प्यात समावेश आहे. आठही लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी आणि महायुततीच्या उमेदवारांसह अपक्षांनीही प्रचारासाठी चांगलाच जोर लावला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी रोड शो आणि रॅलीवर भर देण्यात आला.

हिंसाचारप्रकरणावरुन देशभर गाजलेल्या मणिपूरच्या एका जागेसह दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्र, आसाम, बिहार, छत्तीसगड, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, जम्मू-काश्मीर राज्यांमध्ये मतदान होणार आहे. तर केरळच्या सर्वच २० लोकसभा जागांवर मतदान होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राहुल गांधींसह दिग्गजांच्या सभा

दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील आठ लोकसभा मतदारसंघांत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस नेते राहुल गांधी, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या नेत्यांच्या सभा झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नांदेड आणि परभणी या दोन ठिकाणी सभा घेतल्या. राहुल गांधींनी नवनीत राणांच्या विरोधात अमरावती मतदारसंघात सभा घेतली अमित शाह यांचीही अमरावती, अकोला मतदारसंघात सभा झाली. या नेत्यांव्यतिरिक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांनीही या मतदारसंघांमध्ये सभांचा धडाका लावला होता.

कसे आहे ५ मतदारसंघातील चित्र?

दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यातील लोकसभा जागांवर मतदान होणार आहे. यामध्ये विदर्भातील ५ तर मराठवाड्यातील ३ मतदारसंघांचा समावेश आहे. मराठवाड्यातील नांदेडमध्ये भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर विरुद्ध काँग्रेसचे वसंत चव्हाण, परभणीत ठाकरे गटाचे संजय जाधव विरुद्ध रासपचे महादेव जानकर, नांदेडमध्ये ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर विरुद्ध शिंदेंचे बाबुराव कदम कोहळीकर अशा लढती होणार आहेत. तर विदर्भातील बुलढाण्यात ठाकरेंचे नरेंद्र खेडेकर विरुद्ध शिंदेंचे प्रतापराव जाधव विरुद्ध शेतकरी नेते रविकांत तुपकर अशी तिरंगी लढत आहे. अकोल्यातही तिरंगी लढत होत असून भाजपचे अनुप धोत्रे, काँग्रेसचे अभय पाटील, वंचितचे प्रकाश आंबेडकर रिंगणात आहेत. तर यवतमाळ-वाशिममध्ये शिंदे गटाच्या राजश्री पाटील विरुद्ध ठाकरे गटाचे संजय देशमुख, वर्ध्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अमर काळे विरुद्ध भाजपचे रामदास तडस, अमरावतीत भाजपच्या नवनीत राणा विरुद्ध काँग्रेसचे बळवंत वानखेडे असे सामने पाहायला मिळणार आहेत.

देशभरात दुसऱ्या टप्प्यात होत असलेल्या निवडणुकीत हिंसाचार प्रकरणी देशभर गाजलेल्या मणिपूरमध्ये एका लोकसभा मतदारसंघात निवडणूक होत आहे. केरळच्या सर्वच २० जागांवर मतदान होत आहे. तर कर्नाटकमध्ये १४ जागांवर मतदान होईल. राजस्थानमधील १३ जागांवर मतदान होणार आहे. लोकसभेच्या सर्वाधिक ८० जागा असलेल्या उत्तरप्रदेशमध्ये दुसऱ्या टप्प्यात ८ जागांवर मतदान होत असून यामध्ये मथुरा, मेरठ, गाझियाबाद, अलिगढ, अमरोहा, बागपत, गौतमबुद्ध नगर, बुलंदशहर या जागांचा समावेश आहे. महाराष्ट्रातही ८ जागांवर मतदान आहे. मध्यप्रदेशात ७ तर आसाम, बिहार या राज्यांमध्ये प्रत्येकी ५ जागांवर मतदान होत आहे. छत्तीसगड आणि पश्चिम बंगालच्या प्रत्येकी ३ जागांवर या टप्प्यात मतदान होणार आहे. उर्वरित त्रिपुरा, जम्मू-काश्मीर या ठिकाणी प्रत्येकी एका जागेवर दुसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news