पुणे : सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणीही जन्माला येत नाही. सत्ता जेव्हा हातात येते. तेव्हाच ती हातातून निसटायला लागते, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे म्हणाले. पिंपरी चिंचवड येथे पत्रकारांच्या गौरव संमारंभात राज ठाकरे बोलत होते. या कार्यक्रमात पत्रकारांना पुरस्कार वितरण करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी त्यांनी पत्रकारिता आणि सध्याच्या राजकारणावर भाष्य केलं. ते म्हणाले, सध्या राजकारणी अतिशय वाह्यात बोलत आहेत, तरीही त्यांची वक्तव्ये माध्यमे वारंवार का दाखवतात? असा सवाल राज ठाकरे यांनी या कार्यक्रमात केला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात पत्रकारिता अजूनही जिवंत आहे, ती कायम जिवंत ठेवा, असे आवाहन करत माध्यमांवर खोचक टीकाही केली.
राज यांनी सभांना होणारी गर्दी आणि त्याचं मतांमध्ये होणारं रुपांतर यावर भाष्य केलं. तेव्हा त्यांनी देशाचे दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांचं उदाहरण दिलं. सभांना होणाऱ्या गर्दीचं मतांमध्ये रुपांतर व्हायला वेळ लागतो, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. सध्याची देशभरातील पत्रकारितेची परिस्थिती कशी आहे, हे पाहता आत्ता पुरस्कार देताना मला जाणवलं की, आजही पत्रकारिता जिवंत आहे. म्हणूनच मी आज मनसे अध्यक्ष म्हणून नव्हे तर पत्रकार राज ठाकरे म्हणून उपस्थित आहे, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरे ट्रोलिंग करणाऱ्यांवर चांगले आक्रमक झाले. तुम्ही एकदा मुलाखत दिल्यानंतर त्याच्यावरच्या प्रतिक्रिया का वाचता. ट्रोल करणाऱ्यांचे मेसेज वाचताच कशाला. ती राजकारण्यांनी पाळलेली लोक आहेत. त्यांना महिन्याला पैसे मिळतात. हे निरुद्योगी लोकं आहेत. त्यांना कामधंदा नाही. त्यांचं एकच काम आहे. मोबाईल हातात घेतला की मार याच्या आणि घाल बोटं, अशा शब्दात राज ठाकरे यांनी हल्ला चढवला.
पुढे बोलताना म्हणाले, पत्रकारांवर हल्ले होतात हे चुकीचं आहे. निषेधार्ह आहे. तुम्ही म्हणता लिहिल्यावर तुम्हाला ट्रोल केलं जातं. मग वाचता कशाला. मुलाखत झाली, भाषण झालं, एकदा शब्द गेले ना. मग कुणाला काय वाटेल ते वाटेल. कुणाला आवडलं, कुणाला नाही आवडलं हे कशाला वाचत बसता. त्यावर चार शिव्या पडतात. मग आमचा हिरमसून बसतो. कशाला वाचता. अशा शब्दात राज ठाकरे यांनी ट्रोल करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला.
हेही वाचा