पुढारी ऑनलाईन : पर्वतीय प्रदेशातील बर्फवृष्टीनंतर आता मैदानी भागातील राजधानीत पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच उत्तर भारतात थंडीच्या लाटेनंतर आता राजधानी दिल्लीत हलक्या पावसाची शक्यता वर्तवत, दिल्लीला यलो अलर्टचा इशारा दिला आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामानात प्रचंड बदल होत असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे.
दिल्लीत आजपासून ढगाळ आकाश राहील आणि काही भागात हलका पाऊसही पडू शकतो. तसेच सोमवारी या भागात वेस्टर्न डिस्टर्बन्स हा अधिक तीव्र आणि सक्रिय होणार असल्याने अधिक पाऊस होणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने दर्शवला आहे.
पश्चिम हिमालयीन प्रदेशात हलका/मध्यम स्वरूपाची पाऊस/बर्फवृष्टीची होण्याची शक्यता आहे. तसेच उत्तरेकडील पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि पश्चिम उत्तर प्रदेश या मैदानी प्रदेशात गारपिटांसह हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिला आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात झाले असून, हा पट्टा ३१ जानेवारीला श्रीलंकेकडे सरकणार आहे. दरम्यान, या तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील मध्यमहाराष्ट्र, मराठवाडा या भागात वीजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यातील किमान तापमानात वाढ झाली असून, बहुतांश भागांत ढगाळ वातावरण आहे.