Latest

इर्शाळवाडीची दुर्घटना पाहिली की, डोळ्यासमोर उभे राहते माळीण आणि तळीये गाव, नेमकं काय घडले होतं या गावांमध्ये?

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन: मुंबई, ठाणे, रायगडसह राज्यातील काही भागाला बुधवार 19 जुलैला मुसळधार पावसाने झोडपून काढले. आजही महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. कोकण विभागातील 18 नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर पूर्व विदर्भाचा संपर्क तुटलेला आहे. गेल्या दोन दिवसांपासून रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस बरसत असल्यामुळे नागरिकांची दाणादाण उडाली आहे. या परिस्थितीत रायगडमधील खालापूरजवळील इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडीवर बुधवारी रात्री उशिरा दरड कोसळल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत 100 पेक्षा अधिक लोक अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यानंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून एकूण आतापर्यंत 27 जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आले आहे.

इर्शाळवाडीच्या दुर्घटनेवरुन पुणे जिल्ह्यातील माळीण आणि रायगडमधील तळीये गावात घडलेली दरड दुर्घटना नजरेसमोर येते. 2014 मध्ये माळीण गावामध्ये दरड कोसळल्याने संपूर्ण गाव गाडलं गेलं होतं. तर 2021 मध्ये तळीयेमध्ये देखील अशीच दुर्घटना घडली होती. माळीण आणि तळीयेमध्ये नेमकं काय घडलं होतं हे जाणून घेऊया…

माळीण :

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण हे एक आदिवासी भागातील गाव आहे. पुण्यापासून जवळपास 75 ते 80 किमी अंतरावर डिंभे धरणाच्या परिसरात हे गाव वसललं होतं. त्यावेळी माळीण गावाची लोकसंख्या 750 च्या आसपास होती. 30 जुलै 2014 रोजी पहाटेच्या वेळी डोंगराचा काही भाग खाली आला आणि त्यात 44 पेक्षा जास्त कुटुंब यामध्ये गाडली गेली. पुरुष, महिला, लहान मुले, पाळीव प्राणी आणि जनावरे यांच्यासह सर्वच मातीच्या ढिगाऱ्याखाली गेले. या गावाचं एका क्षणात होत्याच नव्हतं झालं. एका एसटी चालकामुळे ही घटना सर्वांना समजली. पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असतानाच ही दुर्घटना घडली. सहा दिवस-रात्र त्या ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरु होतं. जवळपास 151 मृतदेह गाळातून बाहेर काढण्यात आले. या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करायला घरातील एकही व्यक्तीही जिवंत नव्हती. जिल्हा प्रशासनाने त्यांचे अंत्यविधी केले. राज्यात डोंगर कोसळून गाव गाडल्याची घटना ही पहिलीच घटना होती. या दुर्घटनेनंतर राज्य आणि केंद्र सरकारने ही घटना राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर केली. त्यानंतर सरकारने माळीण गावाचं पुनर्वसन केलं.

तळीये गाव

रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात असणारे तळीये गाव 22 जुलै 2021 रोजी कोसळलेल्या दरडीमुळे उद्ध्वस्त झालं होतं. निसर्गाच्या कुशीत असलेलं हे गाव अवघ्या 24 तासात मातीच्या ढिगारा बनलं. दरड कोसळल्यामुळे या गावातील 35 घरं ढिगाऱ्याखाली गेले होती. या घरांमधील जे कामावर गेले होते, तेवढेच फक्त जिवंत राहिले, उरलेले सर्व ढिगाऱ्याखाली दबले गेले. या गावात सर्वत्र चिखलाचं साम्राज्य निर्माण झालं. तळीयेमध्ये दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस होता. त्यामुळे समोरच्या डोंगराचा भाग खाली आला. गावातील लोक घराबाहेर आले आणि ते डोंगराच्या दुसऱ्या बाजूला आडोशासाठी उभे राहिले. परंतु, जीव वाचवण्यासाठी ज्या डोंगराखाली उभे होते, नेमका त्याच डोंगराचा मोठा भाग कोसळला. यामुळे काही लोक दरडीखाली जागीच दबले गेले. तर काही कोसळलेल्या दरडीबरोबर वाहत गेले. जेवढे लोकं डोंगराच्या आडोशाला उभे होते, त्यातील एकही वाचला नाही. तीन दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर तळीये गावातील ढिगाऱ्यातून 53 मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. मात्र, चौथ्या दिवशी हे बचावकार्य थांबवण्यात आलं आणि बेपत्ता 31 जणांना मृत घोषित करण्यात आलं होतं.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT