पिता न तू वैरी ! मुलासाठी जुळ्या मुलींचा खून | पुढारी

पिता न तू वैरी ! मुलासाठी जुळ्या मुलींचा खून

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  मुलाच्या हव्यासापोटी दोन जुळ्या मुलींचा खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील फुरसुंगी परिसरात हरपळेवस्ती येथे समोर आला आहे. गर्भवती सुनेला मुले गोरी होण्याकरिता सुरुवातीला वेगवेगळ्या गोळ्या खाण्यास दिल्या. मात्र, तरीही मुलीच झाल्यामुळे त्यांना झोपेत दूध पाजून मारून टाकण्यात आले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार हडपसर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. जुळ्या मुलींना मारल्यानंतर मुलीच्या आईला कारने पौड रोडला नेऊन अपघात झाल्याचे भासविले. त्यात जखमी होऊन मुलीच्या आईचा मृत्यू झाला आहे. मात्र, हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप माहेरच्या नातेवाइकांनी केला आहे.

अतुल बाबासाहेब सूर्यवंशी, सासरे बाबासाहेब सूर्यवंशी (वय 62), जयश्री बाबासाहेब सूर्यवंशी (वय 55), दीर अमोल बाबासाहेब सूर्यवंशी (वय 26, सर्व रा. शिवकृपा हरपळे वस्ती, फुरसुंगी) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी श्रीकृष्णा प्रताप लोभे (वय 35, रा. वाघोली) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार डिसेंबर 2018 ते 26 नोव्हेंबर 2019 व 6 फेब्रुवारी 2020 दरम्यान घडला.
फिर्यादी यांची बहीण ऊर्मिला अतुल सूर्यवंशी यांना मुलगाच हवा या कारणामुळे त्यांना मानसिक त्रास देऊन मुले गोरी होण्याकरिता पतीने वेगवेगळ्या गोळ्या खाण्यास दिल्या. त्यानंतरही त्यांना जुळ्या मुली झाल्या. बाळंतपणानंतर सहा महिन्यांनी त्या दोन्ही मुलींसह सासरी आल्या.

ऊर्मिला हिने 26 नोव्हेंबर 2019 रोजी मुलींना दूध पाजून झोपवले असतानाही त्यांच्या पतीने त्या मुली झोपेत असताना सिद्धी (वय 7 महिने) हिला बाहेरील दूध पाजले. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. अशाच प्रकारे 6 फेब्रुवारी 2020 रोजी दुसरी मुलगी रिद्धी (वय 9 महिने) ही झोपली होती. अतुल सूर्यवंशी याने झोपलेल्या मुलीला बाहेरील दूध पाजून तिला जिवे ठार मारले. मुली झोपेत असल्याने पाजलेले दूध श्वासनलिकेत गेल्याने त्यांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला. अमोल सूर्यवंशी हा वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहे. त्याला एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतरही त्याचे खरे कारण शवविच्छेदनात कसे येणार नाही, याची माहिती असल्याचे फिर्यादी यांचे म्हणणे आहे. याबाबत फिर्यादी यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. पण, पोलिसांनी दखल न घेतल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या निर्णयानुसार पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक शिवले तपास करत आहेत.

अतुल सूर्यवंशी याने ऊर्मिला ही आयटी कंपनीत कामाला असल्याचे दाखवून तिच्या नावाने 50 लाख रुपयांचे दोन कंपन्यांचे टर्म इन्शुरन्स काढले होते. त्यानंतर हिंजवडी येथील कंपनीत मुलाखतीला जायचे असे सांगून अतुल सूर्यवंशी हा ऊर्मिला सूर्यवंशी हिला घेऊन कारने पौडकडे गेला. अलिबाग येथे त्यांच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी जायचे असे सांगून घेऊन गेला होता. दरम्यान, त्यांच्या गाडीला अपघात झाल्याचे दर्शविले. या घटनेत ऊर्मिला सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला. पौड पोलिसांनी योग्य दखल न घेतल्याने याबाबतही फिर्यादी यांनी न्यायालयात धाव घेतली असून, त्याची सुनावणी सध्या सुरू आहे.

हेही वाचा :

mumbai rains : मुंबईत मुसळधार पाऊस; लोकलची वाहतूक धीम्‍या गतीने

इथे ओशाळली मानवता..! मणिपूरमध्‍ये दोन महिलांची विवस्‍त्र धिंड, सामूहिक अत्याचार

Back to top button