Latest

RahulGandhi: राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय; लोकशाहीला धक्का देणारा – अजित पवार

मोनिका क्षीरसागर

मुंबई; पुढारी वृत्तसेवा: राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणे; ही बाब संविधानात किंवा लोकशाहीत बसत नाही. लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार घटनेने दिला आहे. तरीदेखील संसदेत अशी खासदारकी रद्द करण्याचा निर्णय घेतला. जो लोकशाहीला धक्का देणारा आहे, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत या घटनेचा माध्यमांशी बोलताना धिक्कार केला आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा मुद्दा आमदार नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला त्यानंतर महाविकास आघाडीच्या आमदारांनी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सभात्याग केला. त्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.

पुढे बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, लोकशाहीतील पक्षांमध्ये मतमतांतरे असली तरी देशाच्या स्वातंत्र्यानंतर अशाप्रकारे कोणाची खासदारकी रद्द करण्याची घटना घडलेली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटना दिली. त्यांनी दिलेल्या शिकवणीत अशी भूमिका बसत नाही. अशा घटना व सर्व प्रकार जनता बघत आहे. राज्यकर्त्यांनी सगळ्यांना सोबत घेऊन जायचे असते या देशाच्या पंरपरेला तिलांजली देण्याचे काम या निर्णयामुळे झाल्याचा आरोपही अजित पवार यांनी यावेळी केला.

इंदिरा गांधीजींबद्दल अशाप्रकारे तत्कालीन सरकारने घेतलेली भूमिका जनतेला पटली नव्हती. इंदिरा गांधीना आणीबाणीच्या कारणाने १९७७ साली पराभूत केले. त्यांनाच १९८० साली प्रचंड बहुमताने देशाच्या पंतप्रधानपदी बसवण्याचे काम देखील देशातील जनतेने लोकशाहीच्या मार्गाने केले याचा दाखलाही अजित पवार यांनी याप्रसंगी दिला. सध्या देशात, राज्यात ज्या घटना घडत आहेत ते सर्वसामान्य जनतेला पटणाऱ्या नाहीत, असे सत्ताधाऱ्यांना स्पष्ट बजावत, अजित पवार यांनी राहुल गांधी यांच्यावरील कारवाईचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT